Lok Sabha Election 2024: जेपी नड्डा, अमित मालवीय यांना बेंगळुरू पोलिसांनी 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी समन्स
JP Nadda (Photo Credits: jagatprakashnadda.in)

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांना पक्षाच्या कर्नाटक युनिटने केलेल्या 'आक्षेपार्ह पोस्ट'बद्दल बेंगळुरू पोलिसांनी समन्स बजावले आहे. बुधवारी बंगळुरूमधील हायग्राउंड्स पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यांनी नेत्यांना नोटीस बजावली. जेपी नड्डा आणि अमित मालवीय यांना या व्हिडिओच्या संदर्भात बेंगळुरू पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे.  तत्पूर्वी, त्यांच्याविरुद्ध आणि भाजप कर्नाटक युनिटचे प्रमुख विजयेंद्र यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल एफआयआर नोंदविला गेला होता ज्यामध्ये कथितपणे आरक्षणाच्या राजकारणात काँग्रेस मुस्लिमांची बाजू घेत असल्याचे दाखवण्यात आले होते. (हेही वाचा - Election Commission: भाजपने मुस्लिम आरक्षणाबाबत शेअर केलेला व्हिडिओ हटवा, केंद्रीय निवडणूक आयोगाचे X ला निर्देश)

कर्नाटक भाजपने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे एससी, एसटी आणि ओबीसींच्या तुलनेत मुस्लिमांना मोठा निधी देत असल्याचे दाखवले आहे. दरम्यान या प्रकरणी काल निवडणूक आयोगाने एक्सला हे व्हिडिओ हटवण्याचे निर्देश हे दिले होते.  या व्हिडिओ प्रकरणी एक्सला निवडणूक आयोगाने निर्देश देण्यात आल्याने भाजपावर कोणती कारवाई करेल अशी अपेक्षा होती मात्र अद्याप असे काही झालेले नाही.

भारतात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. देशभरात मतदान सुरु आहे. 4 जूनला लोकसभा मतदानाचा निकाल लागणार असून देशाचा कौल कुणाला आहे, हे स्पष्ट होईल. देशात एकीकडे इंडिया आघाडी आणि दुसरीकडे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सत्ताधारी एनडीए अशी निवडणूक पाहायला मिळत आहे.