भाजपला मोठा झटका; शिवसेनेनंतर आणखी दोन मित्रपक्षांनी सोडली साथ; देशाच्या राजकारणात नवा प्रवाह
Big shock to BJP | | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

Jharkhand Assembly Election 2019: सत्तावाटपाच्या मुद्द्यावरुन शिवसेना-भाजप (Shiv Sena-BJP) युतीत मोठी दरी निर्माण झाली. त्यानंत देशभरातही भाजपला एकापाठोपाठ एक असे जोरदार धक्के बसताना दिसत आहेत. महाराष्ट्रात शिवसेना (Shiv Sena) पक्षासोबत युती तुटल्यानंतर भाजपला झारखंड (Jharkhand) राज्यातही अशाच अनुभवाला सामोरे जावे लागत आहे. झारखंड राज्यात विधानसभा निवडणूक (Jharkhand Assembly Election 2019) जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भापचा मित्रपक्ष असलेल्या रामविलास पासवान (Ram Vilas Paswan) यांच्या लोकजनशक्ती पार्टी (Lok Janshakti Party) ने साथ सोडली. या धक्क्यातून भाजप सावरतो न सावरतो तोच ऑल झारखंड स्टूडेंट यूनियन (All Jharkhand Students Union) या पक्षानेही भाजपची साथ सोडली आहे. या तिन्ही पक्षांसोबतची युती संपुष्टात आली आहे.

झारखंड राज्याच्या राजकीय इतिहासात हे पहिल्यांदाच घडते आहे की, भाजप सुदेश महतो यांच्या ऑल झारखंड स्टूडेंट्स यूनियन पक्षाशिवाय निवडणूक लढणार आहे. सन 2000 मध्ये झारखंड राज्याची निर्मिती झाली. त्यानंतर बहुमताच्या आकड्याची जमवाजमव करुन सत्तास्थापन करण्यासाठी All Jharkhand Students Union हा पक्ष आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आले. तेव्हापासून आजतागायत हे पक्ष युतीद्वारेच निवडणूक लढवत होते.

आजसू अध्यक्ष सुदेश महतो यांच्या मागण्या भाजपला मान्य करण्यास तयार नाही. भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा आणि उपाध्यक्ष ओम माथुर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका बैठकीत हा निर्णय झाला होता. या बैठकीत असाही एक निर्णय झाला की झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजप एका ठिकाणी विनोद सिंह या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देईन. भाजपने ही जागा आजसू पक्षाच्या उमेदवाराला सोडली होती. मात्र, युती मध्येच तुटली. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. (हेही वाचा, निवडणूक आयोगाकडून झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा, 5 टप्प्यात मतदान 23 डिसेंबरला मतमोजणी)

सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्यांत म्हटले आहे की, भारतीय जनता पक्ष आजसूला 10 जागा देण्यास तयार आहे. मात्र, आजसू 17 जागांवर ठाम आहे. हे दोन्ही पक्ष युतीद्वारे निवडणुकीला सामोरे जाणार होते. मात्र, आजसूने 17 जागांची मागणी केली आणि इथेच मामला फिसकटला. त्यातच चक्रधरपूर आणि लोहरदगा यांसारख्या जागांवरही दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला होता. विश्वासू मित्रपक्ष असूनही भाजप जागा सोडायला तयार नाही, असा आजसूचा आरोप आहे. आजसूने म्हटले आहे की, आजसू ज्या जागांवर दावा सांगितला आहे तिथे आजसूने प्रचंड मेहनत करुन कार्यकर्त्यांचे जाळे उभारले आहे. तिथे पक्षाने ताकद निर्माण केली आहे.

झारखंड विधानसभा निवडणूक एकूण पाच टप्पयांत पार पडत आहे. यातील पहिल्या टप्प्यासाठी 30 नोव्हेंबरला, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यासाठी अनुक्रमे 7, 12, 16, 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर, 23 डिसेंबर या दिवशी मतमोजणी होणार आहे. तसेच, झालेल्या मतमोजणीचा अंतिम निकालही त्याच दिवशी जाहीर होणार आहे.