Jaipur Police Arrests Bhawna Sharma: महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सरकारने अनेक कठोर कायदे केले, तरीही अशा घटनांमध्ये कोणतीही घट झालेली नाही. दुसरीकडे, अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या या कायद्यांचा दुरुपयोग करत असल्याचे दिसत आहे. असाच एक प्रकार जयपूरमधून (Jaipur) उघडकीस आला आहे. या ठिकाणी पोलिसांनी, लोकांना बलात्काराच्या (Rape) खोट्या आरोपात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला अटक केली आहे. भावना शर्मा (Bhawna Sharma) नावाच्या या तरुणीने आतापर्यंत पैसे उकळण्यासाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये बलात्काराचे खोटे गुन्हे दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या एका वकिलाच्या तक्रारीच्या आधारे या तरुणीला अटक करण्यात आली.
अहवालानुसार, भावना शर्माने या वकिलाविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. आरोपी महिलेवर बलात्कार आणि ब्लॅकमेलिंग संबंधित वेगवेगळे 14 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, 8 मे रोजी वकील नितीन मीना यांनी सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, भावना शर्मा नावाच्या आरोपी महिलेने त्यांच्यासोबत मैत्री करून लग्नासाठी दबाव आणला, त्यानंतर खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली. भावना शर्माने ज्योती नगर पोलीस ठाण्यात नितीन मीना यांच्याविरुद्ध बलात्काराच्या कलमांखाली गुन्हाही दाखल केला आहे. तिने याआधीही अनेक लोकांवर असे गुन्हे दाखल केल्याचे समोर आले. वकिलाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत भावना शर्माला अटक करून, न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली.
आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की, भावना शर्माने 2016 ते 2024 या आठ वर्षांच्या कालावधीत असे 14 गुन्हे दाखल केले आहेत आणि त्यापैकी बरेच खोटे असल्याचे आढळले आहे. गुरुग्राममधील न्यायालयाने आरोपी महिलेला तिच्यावर खोट्या बलात्काराच्या प्रकरणात कारवाईसाठी पत्रही लिहिले होते. महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या विशेष तपास युनिटचे अतिरिक्त डीसीपी गुरु शरण राव यांनी तपासात भावना शर्मा दोषी आढळली असल्याचे सांगितले. तिच्याविरुद्ध ऑनलाइन पैशांच्या व्यवहाराचे, खंडणीचे इतर अनेक पुरावेही मिळाले आहेत. तिच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) कलम 388 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. (हेही वाचा: Uttar Pradesh Crime: ननंद आणि सासूकडून पत्नीला बेदम मारहाण, पतीने शूट केला व्हिडिओ)
भावना शर्माचा खोटे बलात्कार, विनयभंग आणि प्राणघातक हल्ल्याचे गुन्हे दाखल करण्याचा इतिहास आहे. यापैकी तीन बलात्कार आणि एका मारहाणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी यापूर्वीच आरोपपत्र दाखल केले आहे. इतर नऊ प्रकरणांमध्ये एफआर सादर करण्यात आले आहेत. एका प्रकरणात अद्याप तपास सुरू आहे.