भारतात 17 जुलैपासून सुरु होणार आंतरराष्ट्रीय विमान सेवा; जाणून घ्या कोणते देश आणि एअरलाईन्स कंपन्या चालवतील उड्डाणे
Civil Aviation Minister Hardeep Singh Puri (Photo Credits: ANI)

नागरी उड्डयन मंत्री (Civil Aviation Minister) हरदीपसिंह पुरी (Hardeep Singh Puri) यांनी गुरुवारी ‘वंदे भारत मिशन’बाबत पत्रकार परिषद घेतली. कोरोना विषाणूमुळे देशात लॉक डाऊन जाहीर केले होते, यामुळे बंद झालेल्या आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा पुन्हा सुरू होत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच पुरी म्हणाले की, कोविड-19 पूर्वी देशात जितकी देशांतर्गत उड्डाणांची संख्या होती, त्याच्या 55 ते 60 टक्के उड्डाणे दिवाळीपर्यंत सुरु होतील. त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय विमान सेवांबाबत महत्वाची माहिती दिली. पुरी यांनी सांगितले की, एअर फ्रान्स एअरलाईन 18 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान पॅरिस ते दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू साठी 28 विमाने चालवित आहे.

याशिवाय 17 ते 31 जुलै दरम्यान अमेरिकन एअरलाइन्सची 18 विमाने भारतात चालणार आहेत. याव्यतिरिक्त, जर्मन एअरलाइन्सनेदेखील भारतामध्ये विमाने चालविण्यास परवानगी मागितली आहे व त्यावर काम सुरू आहे. 23 मार्चपासून देशात कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास सेवेवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र ‘वंदे भारत मिशन’द्वारे ठराविक उड्डाणे चालू होती.

एएनआय ट्वीट -

कोरोना संकटाच्या वेळी 'वंदे भारत मिशन' व इतर माध्यमातून 6,50,000 हून अधिक भारतीय देशात परतले आहेत. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत मिशन अंतर्गत या भारतीयांना एअर इंडियाच्या माध्यमातून परदेशातून परत आणले गेले. दुबई आणि युएईमधून मोठ्या संख्येने भारतीयांना घरी आणले गेले. त्याच वेळी 30 हजार भारतीयांना या अभियानाअंतर्गत अमेरिकेतून परत आणण्यात आले.' (हेही वाचा: Air India च्या कर्मचाऱ्यांना झटका; कंपनी निवडक लोकांना विना पगार पाच वर्षांपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवणार)

दरम्यान, कोरोना साथीच्या आजाराचा सर्व देशांवर वाईट परिणाम झाला आहे. जगातील अनेक देशांमध्ये अजूनही लॉकडाउन चालू आहे. यामुळेच तेथे राहणाऱ्या भारतीयांना घरी येण्यास भाग पाडले जात आहे. अडकलेल्या भारतीयांना परदेतून परत आणण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, भारतात राहणाऱ्या परदेशी लोकांनाही त्यांच्या देशात पाठवले जात आहे.