पुढील वर्षी देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) भारतातील सर्वात मोठा शॉपिंग फेस्टिव्हल (India’s Biggest Shopping Festival) आयोजित केला जाणार आहे. खुद्द दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली. यामुळे दिल्लीला जगात एक वेगळी ओळख मिळेल, असे केजरीवाल यांनी सांगितले. अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी आपल्या भाषणात नमूद केले की, पुढील वर्षी 28 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान दिल्ली शॉपिंग फेस्टिव्हल दिल्लीत साजरा केला जाईल. हा देशातील सर्वात मोठा शॉपिंग फेस्टिव्हल असेल.
केजरीवाल म्हणाले की, ते या फेस्टिव्हलला देशातील सर्वात मोठा शॉपिंग फेस्टिव्हल बनवू इच्छित आहेत. यामध्ये जगभरातील लोकांना आमंत्रित केले जाईल, जेणेकरून त्यांना दिल्ली आणि इथली संस्कृती अनुभवता येईल. सीएम केजरीवाल म्हणाले की, या उत्सवात प्रत्येकासाठी नक्कीच काहीतरी असेल. लोकांना यात अभूतपूर्व अनुभव देण्याचा प्रयत्न केला जाईल.
या फेस्टिव्हलमध्ये अनेक प्रदर्शने भरवण्यात येणार आहेत. देशभरातून अनेक कलाकारांना आमंत्रित करण्यात येणार असून या एका महिन्यात 200 मैफली होणार आहेत. अरविंद केजरीवाल म्हणाले की, यामुळे दिल्लीला आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर करण्याची एक विशेष संधी मिळणार आहे. यामुळे हजारो रोजगाराच्या संधीही निर्माण होतील. (हेही वाचा: आता रेस्टॉरंटमध्ये खाल्ल्यावर भरावा लागणार नाही सर्व्हिस चार्ज; CCPA ने जारी केली नवीन मार्गदर्शक तत्त्वे)
भारताच्या इतिहासातील हा सर्वात मोठा शॉपिंग फेस्टिव्हल असेल, असा दावा केजरीवाल यांनी केला आहे. 28 जानेवारी 2023 पासून सुरू होणारा हा 30 दिवसांचा महोत्सव 26 फेब्रुवारी 2023 पर्यंत चालणार आहे. अरविंद केजरीवाल म्हणाले की, या महोत्सवात भरपूर सवलत मिळणार आहे. यातील सर्व मार्केट आणि स्टोअरमधील उत्पादनांवर सूट मिळेल. क्रीडा, मनोरंजन, अध्यात्म, तंत्रज्ञानावर आधारित प्रदर्शने भरवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. इतकेच नाही तर या महोत्सवात दिल्लीचे खाद्यपदार्थही चाखायला मिळणार आहेत.