Indian Railways (Photo Credits: I File Image)

कोरोना विषाणू (Coronavirus) संकटामुळे कित्येक महिन्यांपासून बंद असलेली भारतीय रेल्वे (Indian Railways) आता देशभर सुरळीत सुरू आहे. लोक सावधगिरीने, सुरक्षेच्या नियमांचे पालन करून देशभर प्रवास करीत आहेत. मात्र, काही माध्यमांनी अशी बातमी दिली होती की रेल्वे प्रवाशांच्या भाड्यात वाढ करत आहे. ही बातमी समोर आल्यानंतर रेल्वेवर टीकादेखील सुरू झाली होती, पण आता रेल्वेने स्पष्ट केले आहे की अशी कोणतीही वाढ झाली नाही किंवा होणार नाही. रेल्वेच्या भाडे वाढीबाबत माध्यमांनी दिलेल्या बातम्या बनावट असून, सध्यातरी असे कोणतेही नियोजन नसल्याचे भारतीय रेल्वेने सांगितले आहे.

वृत्तसंस्था एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. भारतीय रेल्वेने म्हटले आहे, ‘प्रवाशांच्या भाड्यात काही वाढ होण्याची शक्यता माध्यमांनी वर्तवली आहे. ही बातमी निराधार आणि कोणत्याही वास्तविक आधाराशिवाय आहे. भाडेवाढ करण्याचा कोणताही विचार विचाराधीन नाही. मीडियाने असे अहवाल प्रसिद्ध किंवा प्रसारित करू नये.’ तत्पूर्वी, भारतीय रेल्वेने सणासुदीच्या काळात भाडे वाढविण्याच्या बातम्याही खोट्या असल्याचे सांगितले होते.

विशेष म्हणजे रेल्वेने गेल्या वर्षी 1 जानेवारीला प्रवासी भाडे वाढविले होते. तेव्हा ते प्रति किलोमीटर चार पैसे करण्यात आले होते. वातानुकूलित -1,2,3, चेअरकार, स्लीपरसह, सामान्य श्रेणीमध्ये वाढ करण्यात आली होती. मेल-एक्स्प्रेसच्या स्लीपर क्लासमध्ये भाडे प्रति किलोमीटर दोन पैसे वाढविण्यात आले होते. तर, गेल्या महिन्यात रेल्वेने म्हटले होते की, सामान्य रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत निश्चित तारीख सांगणे शक्य नाही. (हेही वाचा: देशात Bird Flu चा धोका; 'या' राज्याने जाहीर केला State Disaster, अनेक राज्यांत अलर्ट जारी)

2019 च्या तुलनेत डिसेंबरमध्ये 2020 पर्यंत प्रवासी उत्पन्नात 87 टक्के घट झाली आहे. डिसेंबरमध्ये रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, चालू आर्थिक वर्षात प्रवाशांकडून रेल्वेला मिळणारा महसूल 4,600 कोटी रुपये आहे. मार्च 2021 पर्यंत ही रक्कम 15,000 कोटी रुपयांवर जाईल असा अंदाज आहे. 2019 मध्ये रेल्वेने प्रवाशांकडून 53,000 कोटी रुपये कमावले. प्रवाशांच्या उत्पन्नात घट झाल्याची भरपाई फ्रेट उत्पन्नाद्वारे केली जाईल असे यादव म्हणाले.