Indian Railways | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक (Senior Citizens) असाल आणि भारतीय रेल्वेने(Indian Railways) प्रवास करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयाने संसदेत माहिती दिली आहे की, कोरोना काळात तिकीटावर देण्यात येणारी सूट बंद करण्यात आली आहे. कोरोना व्हायरस महामारीपूर्वी ज्येष्ठ नागरिकांना भारतीय रेल्वेतून प्रवास करताना तिकीट दरांमध्ये सवलत दिली जात होती. मात्र आता या महामारीचा प्रादूर्भाव बराचसा कमी झाला आहे. त्यामुळे देशभरातील रुग्णसंख्याही बरीच कमी होते आहे. त्यामुळे सध्या तरी ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीट दरांमध्ये कोणती सवलत देण्याचा केंद्र सरकारचा विचार नाही, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी (Ashwini Vaishnaw) लोकसभेत बोलताना दिली.

कोरोना महामारीनंतरही ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीट दरात सवलत कायम राहिली अशी प्रवाशांची अपेक्षा होती. केंद्र सरकारने ही अपेक्षा मात्र पूर्ण केली नाही. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक असलेल्या प्रवाशांना फटका बसला आहे. आगोदर सवलतीत होणारा प्रवास आता त्यांना तिकीटाचे पूर्ण पसै देऊन करावा लागणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या निर्णयाने भारतीय रेल्वेला मात्र चांगलाच फायदा होणार आहे. (हेही वाचा, Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवासात मिळणार ब्लँकेट आणि चादर; कोरोनामुळे थांबवण्यात आली होती सुविधा)

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी लोकसभेत माहिती देताना सांगितले की, कोरोना महामारी कमी झाल्यानंतर नागरिकांच्या सेवेसाठी काही विशेष रेल्वे सुरु करण्यात आल्या आहेत. या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारे तिकीट दरांमध्ये सवलत देण्यात आली नाही. मात्र, दिव्यांग, गंभीर आजार असलेले रुग्ण, आणि विद्यार्थ्यांना या ट्रेनमध्ये सवलत आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात सवलत देण्याबाबत मंत्रालय सध्यातरी कोणताहीविचार करत नसल्याचे वैष्णव यांनी सांगितले.