Indian Oil कंपनीने लाँच केला हलक्या वजनाचा सिलेंडर, जाणून घ्या याची खास वैशिष्ट्ये
Filber Cylinder (Photo Credits: Twitter)

गॅस सिलेंडर वजनाने जड असल्या कारणाने अनेकदा हा घरगुती सिलेंडर ने-आण करताना लोकांची चांगलीच दमछाक होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी इंडियन ऑईल (Indian Oil) कंपनीने एक नवा सिलेंडर (Cylinder) लाँच केला आहे. या सिलेंडरचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा सिलेंडर वजानाने खूप हलका आहे. खास मॉड्यूलर किचनसाठी (Modular Kitchen) हे सिलेंडर डिझाईन करण्यात आले असून याचा वापर कुठेही करता येईल. तसेच यात गॅस किती शिल्लक आहे हेदेखील तुम्हाला दिसणार आहे. याबाबतचे ट्विट इंडियन ऑईल कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर पेजवर केले आहे.

इंडियन ऑईलनं ट्विटद्वारे या सिलेंडर विषयी माहिती दिली आहे. आपल्या मॉड्यूलर किचनला साजेसे असे या सिलेंडरचे आकर्षक डिझाइन आहे. हे नवीन प्रकारचे सिलेंडर सध्या हैदराबाद आणि दिल्लीमध्ये उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी आपण आपल्या जवळच्या इंडेन वितरकाशी संपर्क साधावा, असं कंपनीनं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.हेदेखील वाचा- Petrol and Diesel Prices in India Today: सलग तिसर्‍या दिवशी पेट्रोल- डिझेल दरामध्ये वाढ; पहा मुंबई सह मेट्रो सिटी मधील इंधनाचे दर

इंडियन ऑईलच्या या सिलेंडविषयी बोलायचे झाले तर, सध्या हा 5 आणि 10 किलोच्या आकारात उपलब्ध आहेत. सध्या घराघरात लोखंडी 14.2 किलो गॅस असणारे लोखंडाचे सिलेंडर वापरले जातात. देशात प्रथमच फायबरचे सिलेंडर उपलब्ध करण्यात आले आहेत.

फायबरपासून बनवलेले हे सिलेंडर वजनाने खूप हलके आणि रंगीत आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या गॅस सिलेंडर्सपेक्षा हे वजनाला किमान 50 टक्के हलके असतील. फायबरपासून बनवलेल्या या सिलेंडरमध्ये जास्तीत जास्त 10 किलो गॅस असेल. सिलेंडरचा काही भाग पारदर्शक असेल, त्यामुळे ग्राहकांना सिलेंडरमध्ये किती गॅस उरला आहे हे सहज पाहता येईल.

सिलेंडरची ने-आण करताना महिलांना तसेच नागरिकांना होणारा नाहक त्रास यामुळे कमी होईल. या सगळ्या अडचणी या फायबर सिलेंडर्समुळे सोप्या होण्याची शक्यता आहे.