अदानी समूह आणि हिंडेनबर्ग रिसर्च (Hindenburg Research) वादाचा भारतीय शेअर बाजारावर (Indian Stock Market) नकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज (सोमवार, 12 ऑगस्ट) सकाळी बाजार सुरु झाला तेव्हा सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) काहीशा घसरणीनेच सुरु झाले. निफ्टी निर्देशांक 0.29% घसरणीसह म्हणजेच 71.65 अंकांनी घसरून 24,295.85 वर उघडला, तर सेन्सेक्स 284.6 अंकांनी म्हणजे 0.36% घसरणीसह 79,421.31 वर आला. बाजारातील तज्ज्ञ अभ्यासकांचा दावा आहे की, आजच्या घसरणीला जागतीक पातळीवरील घडामोडी कारणीभूत असल्या तरी, अदानी आणि हिंडेनबर्ग वादाची किनार आहे.
अदानी-हिंडेनबर्ग वादाचा गुंतवणुकदारांवर परिणाम?
शेअर बाजार आणि गुंतवणूक अभ्यासक सांतात की, जागतिक आणि देशांतर्गत दोन्ही घटक या आठवड्यात बाजाराच्या हालचालींवर प्रभाव टाकतील. जागतिक बाजारपेठा आगामी यूएस ग्राहक डेटा आणि कोर सीपीआय आकडेवारीवर बारकाईने लक्ष ठेवतील, जे यूएस अर्थव्यवस्थेच्या कामगिरीबद्दल दृष्टीकोण प्रदान करू शकतात. गुंतवणुकदारांनी देशांतर्गत, अदानी समूहाशी संबंधित ताज्या हिंडेनबर्ग अहवालावर लक्ष केंद्रित केले आहे. तथापि, या घडामोडींचा बाजारावर फारसा परिणाम दिसणार नाही, असे मत काही अभ्यासक व्यक्त करतात. (हेही वाचा, Who is Madhabi Puri Buch? हिंडनबर्ग रिसर्च अहवालामुळे चर्चेत आलेल्या माधबी पुरी बुच आहेत तरी कोण? घ्या जाणून)
बुच दाम्पत्याने फेटाळले आरोप
सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच (Madhabi Buch) आणि त्यांचे पती धवल बुच यांच्या विरुद्ध अदानी समूहाशी संबंधित आर्थिक अनियमिततांच्या कथित सहभागाबाबत यूएसस्थित शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपांमुळे हा वाद निर्माण झाला आहे. दोघांनीही आरोप नाकारले आहेत, त्यांना "निराधार" आणि "कोणतेही सत्य नसलेले" म्हटले आहे आणि सर्व संबंधित आर्थिक कागदपत्रे उघड करण्याची ऑफर देऊन अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे वचन दिले आहे. (हेही वाचा, Hindenburg Research Shares Cryptic Post: 'भारतात काहीतरी मोठे घडणार' हिंडनबर्गचे ट्विट; शेअर बाजार, उद्योगविश्वात खळबळ)
हिंडनबर्ग रिसर्च आरोप काय?
दरम्यान, यूएस-आधारित फर्म हिंडनबर्ग रिसर्चने आरोप केला आहे की, SEBI चेअरपर्सन माधबी बुचआणि त्यांचे पती धवल बुच यांनी अदानी मनी सिफनिंग स्कँडलशी संबंधित अस्पष्ट ऑफशोअर (Offshore Entities) संस्थांमध्ये भाग लपवला होता. बर्म्युडा आणि मॉरिशसमध्ये असलेल्या या संस्था विनोद अदानींनी ( Adani Group) वापरलेल्या जटिल संरचनेचा भाग असल्याचा दावा फर्मने केला आहे. 10 ऑगस्ट 2024 रोजी प्रकाशित झालेला हिंडनबर्गचा नवीन अहवाल, भारताशी संबंधित महत्त्वपूर्ण खुलाशांद्वारे इशारा देतो. अहवालात असे सुचवण्यात आले आहे की, गंभीर नियामक हस्तक्षेप टाळण्याचा अदानी समूहाचा स्पष्ट आत्मविश्वास SEBI चेअरपर्सन यांच्याशी असलेल्या संबंधांशी जोडला जातो.
एक्स पोस्ट
Sensex opens in red; currently down by 246.38 points (-0.31%), trading at 79,459.53 pic.twitter.com/5kFQu4qK3S
— ANI (@ANI) August 12, 2024
हिंडेनबर्गने अदानी समूहावर केलेले आरोप नवे नाहीत. या आधीही या संस्थेने या समूहावर आरोप केले आहेत. दरम्यान, आता या वादात सेबीच्या अध्यक्षांनाच ओढल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम गुंतवणूकदारांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.