Indian Economy: 2029 पर्यंत जर्मनी आणि जपानला मागे टाकून भारत बनू शकतो जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था- SBI Report
अर्थव्यवस्था | प्रतीकात्मक फोटो (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोरोना नंतर भारतीय अर्थव्यवस्थेने (Indian Economy) चांगलाच वेग घेतला आहे. याआधी 2015, 2018 आणि 2020 मध्ये, जगभरातील अनेक संशोधन संस्थांनी दावा केला होता की, 2025 पर्यंत भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था बनेल आणि 2030 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. आता 2025 च्या तीन वर्षे आधी म्हणजेच 2022 मध्येच ब्रिटेनला (Britain) मागे टाकत भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली आहे. त्यानंतर आता एसबीआयच्या (SBI) एका अहवालात असे नमूद केले आहे की, 2014 पासून देशाने स्वीकारलेल्या मार्गामुळे भारत 2029 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची शक्यता आहे.

या बदलांमुळे, सध्याच्या विकास दरानुसार, भारत 2027 मध्ये जर्मनी आणि 2029 पर्यंत जपानपेक्षा मोठी अर्थव्यवस्था बनेल. अहवालानुसार, या वर्षी पहिल्या तिमाहीत विकास दर 13.5% आहे. या दराने भारत या आर्थिक वर्षात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होण्याची शक्यता आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास असाच सुरू राहणार असून येत्या काही वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे मत माजी मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. अरविंद विरमानी यांनी व्यक्त केले. 2014 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था जगातील 10 व्या क्रमांकावर होती.

आर्थिक वर्ष 2022-23 साठी भारताचा जीडीपी वाढीचा दर सध्याच्या 6.7 टक्क्यांवरून 7.7 टक्के असा अंदाज आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा वाटा 3.5 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, जो 2027 पर्यंत 4 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. 2014 मध्ये तो 2.6% होते. सध्या जागतिक अर्थव्यवस्थेत जर्मनीचा वाटा 4 टक्के आहे. नवीन गुंतवणुकीबाबत चीनचा वेग मंदावला असल्याने आगामी काळात भारताला याचा फायदा होण्याची शक्यता असल्याचे अहवालात म्हटले आहे. (हेही वाचा: ऑगस्टमध्ये बेरोजगारीचा दर 8.3 टक्क्यांसह एका वर्षातील उच्चांकावर; हरियाणामध्ये सर्वाधिक बेरोजगारी, जाणून घ्या महाराष्ट्राची स्थिती)

दरम्यान, आपल्या आक्रमक धोरणांमुळे चीन केवळ आशियाच नव्हे तर युरोप आणि अमेरिकेपासूनही दूर होत आहे. त्यामुळे विदेशी गुंतवणूकदारांमध्येही त्याची प्रतिमा खराब झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून, विशेषत: रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर, चीनमधील परकीय गुंतवणुकीत तर लक्षणीय घट झाली आहेच, पण गुंतवणूकदारांनीही तिथून आपला निधी काढण्यास सुरुवात केली आहे.