एकीकडे भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे, तर दुसरीकडे देशातील श्रीमंत लोक देश सोडून जात आहेत. अहवालानुसार, यावर्षी भारतातील सुमारे 6500 लक्षाधीश लोक देश सोडण्याच्या तयारीत आहेत. हा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. यंदाच्या 2023 च्या अहवालात सादर केलेली आकडेवारी खरी ठरली तर, चीननंतर भारत हा जगातील दुसरा देश असेल जिथून इतक्या मोठ्या संख्येने श्रीमंत इतर देशांमध्ये स्थलांतरित होतील. भारतातील हे अब्जाधीश दुबई, सिंगापूरकडे आकर्षित होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेन्ली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट 2023 नुसार, 2023 मध्ये, उच्च नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स (HNI) देश सोडून जाण्याच्या बाबतीत चीन पहिल्या स्थानावर आहे. 2023 मध्ये 13,500 श्रीमंत लोक चीनसोडून इतर देशात जाऊ शकतात. गेल्या वर्षी 10,800 लक्षाधीशांनी चीन सोडला होता. यानंतर भारताचा क्रमांक येतो, जिथून यावर्षी 6500 लक्षाधीश देश सोडून जाऊ शकतात. गेल्या वर्षीही भारतातून 7500 लक्षाधीश बाहेर गेले होते. देश सोडणाऱ्या श्रीमंतांच्या बाबतीत यूके जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. तेथून यंदा 3200 लक्षाधीश देश सोडून जाऊ शकतात. गेल्या वर्षी ही संख्या 1600 होती.
हेन्लीच्या या वार्षिक प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्टमध्ये अतिश्रीमंतांच्या श्रेणीत अशा लोकांना स्थान देण्यात आले आहे, जे इतर कोणत्याही ठिकाणी (इतर कोणत्याही देशात) किमान 10 लाख डॉलर्स किंवा 8.2 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास सक्षम आहेत. या गुंतवणुकीत एखाद्याची मालमत्ता, रोख रक्कम किंवा शेअर्स यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. यामध्ये दायित्वे समाविष्ट नाहीत. आता शक्यता वर्तवली गेली आहे की, यंदा भारतामधून असे साधारण साडेसहा हजार अतिश्रीमंत लोक देशाबाहेर स्थायिक होऊ शकतात. (हेही वाचा: दिल्ली आणि मुंबईचा जगातील 'अनफ्रेंडली' शहरांच्या यादीत समावेश; टोरंटो ठरले सर्वात Friendliest City)
हेन्लीच्या अहवालात म्हटले आहे की, श्रीमंतांसाठी यावर्षी सर्वाधिक पसंतीचे देश ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर, अमेरिका आणि स्वित्झर्लंड असू शकतात. आकडेवारीनुसार, 2022 च्या अखेरीस, भारत जगातील टॉप 10 श्रीमंत देशांच्या यादीत समाविष्ट झाला होता. हेन्लीच्या अहवालानुसार, सध्या भारतात एकूण श्रीमंतांची संख्या 3,44,600 आहे. यापैकी, सुमारे 1078 असे लोक आहेत, ज्यांची एकूण संपत्ती $100 दशलक्षपेक्षा जास्त आहे. याशिवाय भारतातील 123 लोक असे आहेत ज्यांची संपत्ती 1 अब्ज डॉलर किंवा 8,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.