Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

जगात कोरोना बाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. भारतात सलग दोन दिवस 94000 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मागील 24 तासांत 94,612 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे देशातील कोरोना संसर्गातून बरे झालेल्यांची संख्या 43 लाखांच्या पार गेली आहे. परीणामी, कोविड-19 चा रिकव्हरी रेट (Recovery Rate) 79.68% झाला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून (Health Ministry) देण्यात आली आहे. (PM Modi COVID-19 Review Meeting with CM's: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 23 सप्टेंबर रोजी 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह कोविड-19 संदर्भात आढावा बैठक)

कोरोनामुक्त झालेले 60% रुग्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या 5 राज्यांमधील आहेत. यात कोरोनावर मात केलेल्यांच्या संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. एका दिवसांत महाराष्ट्रातून 23,000 आणि कर्नाटक, आंध्र प्रदेशातून 10,000 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

ANI Tweet:

दरम्यान, सध्या भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 54,00,620 वर पोहचला आहे. त्यापैकी 10,10,824 सक्रीय रुग्ण असून 43,03,044 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात कोरोना संसर्गामुळे तब्बल 86,752 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मागील 24 तासांत नव्या कोरोना बाधित 92,605 रुग्णांची भर पडली असून 1,133 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना बाधितांच्या संख्येत दुसऱ्या स्थानी असलेला भारत कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या क्रमवारीत अव्वल ठरला आहे. देशातील तब्बल 80% रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. त्यामुळे वरील आकडेवारी पाहता देशात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांपेक्षा कोरोनावर मात केलेल्यांच्यी संख्या अधिक आहे. हे चित्र दिलासादायक असले तरी कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे.