अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भारत-चीन संबंधांवरील वक्तव्य भारताने खोडून काढले; ट्रम्प-मोदी यांचे शेवटचे संभाषण 4 एप्रिल रोजी झाल्याचा खुलासा
Narendra Modi and Donald Trump | File Image | (Photo Credits: IANS)

भारत आणि चीन संबंधांबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (United States President Donald Trump) यांनी केलेले व्यक्तव्य भारताने खोडून काढले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात शेवटचे संभाषण 4 एप्रिल 2020 रोजी झाले होते. हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (Hydroxychloroquine) संबंधित हे संभाषण होते. तसंच काल (गुरुवार, 28 मे) परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs) देखील याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. यावरुन भारताचे चीनसोबत थेट संबंध आहेत, हे स्पष्ट होते. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. (भारत-चीन संबंधावर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट; म्हणाले दोन्ही देशांमध्ये अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार)

पूर्व लडाख मधील भारत-चीन सीमेवरील वाद सोडवण्यासाठी भारत चीनसोबत चर्चा करत आहे, असे स्पष्टीकरण गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाने दिले होते. 28 मे रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-चीन सीमेवरील वाद मिटवण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. त्यानंतर ट्र्म्प म्हणाले की, "त्यांनी या विषयावर पंतप्रधान मोदींसह चर्चा केली असून सध्या मोदी चांगल्या मूडमध्ये नाही आहेत."

ANI Tweet:

गुरुवारी पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, "भारत आणि चीन मध्ये खूप मोठा वाद सुरु आहे. दोन्ही देशांची लोकसंख्या 1.4 बिलियन इतकी प्रचंड आहे. दोन्ही देशांचे लष्कर अतिशय सक्षम आहे. पण भारत खूश नाही आणि चीन देखील खूश नसावा." मी पंतप्रधान मोदींशी बोललो असून सध्या चीनसोबत जे काही सुरु आहे त्यामुळे ते चांगल्या मनःस्थितीत नाहीत, असेही ट्रम्प म्हणाले.

भारत-चीन वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्याची तयारी डोनाल्ड ट्रम्प यांनी दर्शवली होती. यासाठी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले, "भारत-चीन वाद मिटवण्यासाठी अमेरिका तयार असल्याचे आम्ही दोन्ही देशांना सांगितले आहे."