विजय मल्ल्या आणि नीरव मोदी (संग्रहित-संपादित प्रतिमा)

विजय मल्ल्या (Vijay Mallya), नीरव मोदी (Nirav Modi) यांच्यासारखे तब्बल 51 हून अधिक लोक, आर्थिक गुन्हे करून देशातून फरार झाले आहेत. या लोकांनी केलेल्या गुन्ह्यांमुळे देशाचे चक्क 18 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. आर्थिक गुन्ह्याबद्दल माहिती देताना मोदी सरकारतर्फे अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर (Anurag Singh Thakur) यांनी ही गोष्ट सांगितली. याबाबत सीबीआयने सांगितले की, आत्तापर्यंत एकूण 66 प्रकरणांमध्ये 51 गुन्हेगार फरार घोषित आहेत, जे देशातून पळून गेले आहेत. सीबीआयने या गुन्हेगारांविरूद्ध न्यायालयात खटले दाखल केले आहेत आणि याबाबत तपास सुरू आहे.

इतर सर्व एजन्सींविषयी बोलताना, केंद्रीय आर्थिक आणि अप्रत्यक्ष कर मंडळाने सहा आर्थिक गुन्हेगारांविरोधात दिलेल्या अहवालानुसार, हे लोक असे आहेत जे बेकायदेशीरपणे देश सोडून पळून गेले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयात 10 जणांविरूद्ध आर्थिक गुन्हेगार कायदा 2018 अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली. इंटरपोलने कित्येक लोकांना परत आणण्यासाठी रेड कॉर्न रुनोटीस देखील जारी केले आहे. (हेही वाचा: फक्त नीरव मोदी, विजय मल्ल्याच नाही तर तब्बल 36 कर्ज कर्जबुडव्यांंनी केले भारतातून पलायन: ED)

दुसर्‍या प्रश्नाच्या लेखी उत्तरात ठाकूर म्हणाले की, 14 वर्षांपूर्वी बनविलेल्या मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत 13 लोकांना शिक्षा झाली आहे. ते म्हणाले की, यावर्षी ऑक्टोबरपर्यंत मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (पीएमएलए) अंतर्गत एकूण 494 तक्रारी किंवा आरोपपत्र न्यायालयासमोर दाखल केले गेले आहे. पीएमएलएच्या विशेष कोर्टाने आतापर्यंत नऊ प्रकरणात 13 लोकांना दोषी ठरवले आहे.