Bharat Bandh: शेतक-यांकडून आज पुकारण्यात आलेल्या 'भारत बंद' शी संबंधित 'ही' आहे महत्त्वाची माहिती
Bharat Bandh (Photo Credits: Twitter/ANI)

केंद्र सरकारने (Central Government) आणलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात (Farm Bills) शेतकरी संघटना गेले 12 दिवस नवी दिल्लीत आंदोलन करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज संपूर्ण देशात शेतक-यांनी 'भारत बंद' (Bharat Bandh) ची हाक पुकारली आहे. केंद्र सरकारशी वारंवार चर्चा करुन यावर यावर तोडगा न निघाल्याने शेतक-यांनी भारत बंदचे पाऊल उचलले आहे. दरम्यान आज सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत देशभरातील रस्ते वाहतूक बंद राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कामानिमित्त वा अन्य कारणांसाठी घराबाहेर पडताना काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

या भारत बंद विरोधी पक्षांसह अनेक सेलिब्रिटी, खेळाडूंनी देखील पाठिंबा दर्शवला आहे.तसेच कोरोना व्हायरसचा धोका लक्षात आज काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच केंद्र सरकारकडून काही नियम घालण्यात आले आहे. त्याचबरोबर आज दिवसभरात काय महत्त्वाच्या गोष्टी असणार आहेत त्या बद्दलही माहिती करून घ्या.

1. भारत बंद दरम्यान सर्वांना कोविड-19 च्या नियमांचे पालन केलेच गेले पाहिजे. त्यात सोशल डिस्टंसिंग हा महत्त्वाचा भाग आहे.

2. या आंदोलनादरम्यान सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत शेतक-यांचे 'चक्काजाम' आंदोलन असणार आहे. यात उत्तरेकडील राज्यांमध्ये खासकरून पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत.

3. या भारत बंद मध्ये दूध, भाजीपाला या गोष्टी उपलब्ध होणार नाही.

4. यात आपत्कालीन सेवा सुरु राहतील. तसेच लग्नकार्य वा अन्य समारंभ यात कोणताही अडथळा येणार नाही.हेदेखील वाचा- Bharat Bandh: नवी मुंबई APMC मार्केट उद्या बंद, शेतकरी आंदोलनास पाठींबा; माथाडी कामगार संपावर

5. जवळपास 95 लाख ट्रक मालक आणि इतरांचं प्रतिनिधित्व करणारी देशभरातील ट्रान्सपोर्ट संस्थांची मुख्य संस्था ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट काँग्रेस (एआईएमटीसी) ने सांगितलं की, बंदच्या समर्थनार्थ ते संपूर्ण देशात आपलं संचलन बंद ठेवणार आहे. अशातच आजच्या भारत बंदचा वाहतूक सेवांवरही परिणाम होऊ शकतो.

6. सीएआयटी आणि ऑल इंडिया ट्रांसपोर्टर्स वेलफेयर एसोसिएशनने सांगितलं की, दिल्लीसह देशभरात बाजार खुले राहणार आहेत, तसेच परिवहन सेवाही सुरु राहतील.

7. राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांशिवाय या बंदला अनेक बॅंक कर्मचारी संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे. बॅंक यूनियन्सने सरकारला लवकरात लवकर या मुद्द्यावर तोडगा काढावा असं आवाहन केलं आहे.

शेतकरी संघटनांनी पुकारलेला 'भारत बंद' अतिशय शांततापूर्ण आणि सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून झाला पाहिजे याची खबरदारी सर्वांनीच घ्यायची आहे. तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस देखील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.