रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी! धुक्यामुळे ट्रेनला उशीर झाल्यास SMS द्वारे आधीच मिळणार माहिती
Express Trains | (Photo Credit: Archived, Edited, Representative Images)

हिवाळा सर्वात जास्त त्रासदायक ठरतो रेल्वे मोटरचालकांसाठी. थंडीत होणा-या धुक्यामुळे समोरचे धुसर दिसत असल्याने रेल्वे निश्चित स्थळी पोहचविण्यास उशीर होतो. याचा सर्वात जास्त परिणाम होतो रेल्वे प्रवाशांवर. धुक्यामुळे रेल्वेला निश्चित स्थळी पोहोचविण्यास उशीर होतो त्यामुळे प्रवाशांना रेल्वेची वाट बघत तासनतास ताटकळत बसावे लागते. यावर तोडगा म्हणून रेल्वे प्रशासनाने एक नवीन सेवा सुरु केली आहे. या सेवेअंतर्गत आता या पुढे जर धुक्यामुळे रेल्वेला उशीर होत असेल तर एसएमएसच्या माध्यमातून प्रवाशांना पूर्वसूचना दिली जाईल. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, रेल्वे अधिका-यांनी ही माहिती दिली आहे.

रेल्वे प्रवाशांना ट्रेनची वाट पाहत फलाटावर ताटकळत बसावे लागू नये यासाठी ही सेवा सुरु करण्यात आली आहे. थंडीच्या दिवसात धुक्याचा फटका रेल्वे सेवेला बसू नये यासाठी खबरदारी म्हणून ही सेवा सुरु करण्यात आली आहे. साधारणत: 15 डिसेंबरनंतर रेल्वेला धुक्याचा फटकाबसण्यास सुरुवात होते. मात्र यंदा उत्तर भारतातील अनेक भागात धुक्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेक रेल्वेमध्ये धुक्यापासून वाचण्यासाठी फॉग सेफ्टी डिव्हाईस लावण्यात आले आहे.

हेदेखील वाचा- रेल्वे तिकीट आरक्षणासाठी नियमात बदल, जाणून घ्या कोणत्या गोष्टीसाठी किती रुपये स्विकारणार

लोको पायलटला फॉग सेफ्टी डिव्हाईसच्या माध्यमातून ऑडिओ-व्हिज्युअल क्यू सिग्नल देतील, हे सिग्नल जवळ येताच ट्रेनचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी देखील हे डिव्हाईस काम करणार आहे.

SMS द्वारे रेल्वे प्रवाशांना रेल्वेच्या वेळापत्रकाची सुनिश्चित वेळ दिल्याकारणाने प्रवाशांचा वेळ वाचणार आहे आणि मुख्य म्हणजे रेल्वेची वाट पाहत ताटकळत बसण्याच्या त्रासापासून प्रवाशांची सुटका होणार आहे. म्हणूनच या सेवेचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.