केरळमध्ये (Kerala) गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rains) सुरु आहे. या पावसामुळे केरळमध्ये फार मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे इडुक्की (Idukki) जिल्ह्यातील राजमालाई (Rajamalai) येथे दरड कोसळल्याने (Landslide) आपला जीव गमावलेल्या लोकांची संख्या 15 झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन (Kerala CM Pinarayi Vijayan) यांनी या अपघातात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत रक्कम जाहीर केली आहे. याशिवाय पंतप्रधान मदत निधीतून मृत्यू झालेल्यांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये देण्याचेही पंतप्रधानांनी जाहीर केले आहे.
या भूस्खलनात अजूनही बरेच लोक अडकले आहेत. त्यांना वाचविण्यासाठी एनडीआरएफची टीम सातत्याने कार्यरत आहे. केरळ सरकारने हवाई बचाव पथक घटनास्थळावर आणण्याचा प्रयत्न केला, परंतु खराब हवामानामुळे हा प्रयत्न अयशस्वी झाला. या भागात राहणाऱ्या महिला, चहाच्या बागांमध्ये काम करतात तर बहुतेक पुरुष जीप चालक म्हणून काम करतात. मीडिया रिपोर्टनुसार 50 हून अधिक लोक अजूनही अडकले आहेत. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती राम नाथ कोविंद, गृहमंत्री अमित शहा यांनी घटनेबाबत संवेदना व्यक्त केल्या आणि शक्यतो सर्व मदतीचे आश्वासन दिले आहे. (हेही वाचा: कोझिकोड येथे Air India चे विमान धावपट्टीवर उतरताना घसरून दरीत कोसळले; वैमानिकाचा मृत्यू, मदतकार्य सुरु)
एएनआय ट्वीट -
Ex-gratia of Rs 5 lakhs each would be given to the next of kin of those who have lost their lives due to a landslide in Rajamalai, Idukki. The state government will bear the expense of treatment of those injured due to the landslide: Pinarayi Vijayan, Chief Minister, #Kerala https://t.co/S5YSX2xog6
— ANI (@ANI) August 7, 2020
स्पेशल टास्क फोर्सच्या 50 सदस्यांची टीमही राजमालाईसाठी रवाना झाली आहे. दरम्यान, केरळमधील बर्याच भागात जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आणि दरडी कोसळत आहेत. मुसळधार पावसामुळे केरळची परिस्थिती बिकट झाली आहे. हवामान खात्याने मुसळधार पावसाविषयी रेड व ऑरेंज इशारा जारी केला आहे. केरळमधील कोट्टायम, इडुक्की, वायनाड भागात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. 11 ऑगस्टपर्यंत या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. परंतु गेल्या तीन दिवसांपासून या भागात सतत पाऊस पडत आहे. ज्यामुळे बचाव कामात अडचण निर्माण झाली असून, या भागातील दळणवळणाच्या सेवांवरही वाईट परिणाम झाला आहे.