Kerala Flight Accident: कोझिकोड येथे Air India चे विमान धावपट्टीवर उतरताना घसरून दरीत कोसळले; वैमानिक दीपक वसंत साठे यांचा मृत्यू, मदतकार्य सुरु
Air India Express plane crashed while landing in Kozhikode (Photo Credits: ANI)

केरळमधील (Kerala) कोझिकोड (Kozhikode) येथे शुक्रवारी, 8 ऑगस्ट रोजी मोठा विमान अपघात (Flight Accident) झाला. एयर इंडियाचे (Air India) विमान कोझिकोडमधील करीपूर विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरले व थेट दरीत जाऊन कोसळले. हे विमान दुबईहून कोझिकोड येथे येत होते. या विमानात जवळजवळ 191 प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या केरळ मध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे, या पावसामुळे इडुक्की येथे भूस्खलन झाले आहे. या अपघामधील मृत्यूंची संख्या 15 वर पोहोचल्याची बातमी आज आली होती. त्यानंतर आता केरळमधून अजून एका अपघाताची बातमी समोर आली आहे.

पावसामुळे तसेच दृश्यमानता कमी झाल्यामुळे हे विमान घसरल्याचे सांगितले जात आहे. हे विमान घसरून पुढे ते दरीत कोसळले. या अपघातामुळे विमानाचे दोन तुकडे झाले असून, विमानाचा पुढील भाग पूर्णतः नष्ट झाला आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या अपघातामध्ये वैमानिक दीपक वसंत साठे यांचा मृत्यू झाला आहे. धावपट्टीवर विमान घसरल्याची खबर मिळताच रुग्णवाहिका आणि डॉक्टरांची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. सध्या या अपघातात नक्की किती लोक जखमी झाले याची पुष्टी झाली नाही.

एएनआय ट्वीट -

मिळालेल्या माहितीनुसार, या विमानाचा फ्लाइट क्रमांक आयएक्स 1344 (IX1344) आहे. सायंकाळी 4.45 वाजता दुबईहून विमानाने उड्डाण केले होते व सायंकाळी 7 वाजून 41 वाजता हे विमान धावपट्टीवरून घसरले. या विमानात दोन वैमानिकांसह 6 क्रू मेंबर होते. नागरी विमानचालन महासंचालनालय (DGCA) कडून मिळालेल्या माहितीनुसार, लँडिंगच्या वेळी दृश्यमानता 2000 मीटर होती. डीजीसीएने आता या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

एएनआय ट्वीट -

लँडिंगच्या वेळी कोणतीही आगीची माहिती मिळाली नाही. सुरुवातीच्या अहवालांनुसार बचावकार्य सुरू असून प्रवाशांना रुग्णालयात नेले जात असल्याची माहिती राजीव जैन, अतिरिक्त डीजी मीडिया, नागरी उड्डयन मंत्रालय यांनी दिली. विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी पोलिसांना व अग्निशमन दलाला तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच बचाव आणि वैद्यकीय सहाय्य यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. (हेही वाचा:  केरळमधील कोझीकोडच्या करिपूर विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, पाहा व्हिडिओ)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासोबत कोझिकोडे विमान अपघातप्रकरणी फोनवरुन केली चर्चा केली आहे. एअर इंडिया विमानाच्या अपघातानंतर दुबई येथील भारतीय वाणिज्य दूतावासाकडून हेल्पलाईन क्रमांत जारी करण्यात आला आहे. माहितीसाठी 056 546 3903, 0543090572, 0543090572, 0543090575 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.