Covid 19 Test | Representational Image | (Photo Credits: PTI)

देशातील कोरोना बाधितांची वाढती रुग्णसंख्या पाहता खाजगी लॅब्समध्येही कोविड 19 च्या चाचणीला परवानगी देण्यात आली होती. त्यासाठी पूर्वी 4500 रुपये इतके शुल्क आकारले जात होते. आता मात्र राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारने लॅबशी चर्चा करुन कोरोना चाचणीची किंमत ठरवावी, असे पत्र भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (Indian Council of Medical Research) देशातील राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारला लिहिले आहे. भारतात एकूण 428 सरकारी आणि 182 खाजगी लॅबमध्ये कोविड 19 ची चाचणी करण्यात येते. (भारतात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 1,51,767 वर पोहोचली, 83004 रुग्णांवर उपचार सुरु, 64425 जणांना डिस्चार्ज)

ICMR चे डिरेक्टर जनरल डॉ. बलराम भार्गव (Dr Balram Bhargava) यांनी सोमवारी (25 मे) सर्व राज्यातील मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. कोविड 19 टेस्टिंग कीटची निर्मिती योग्य प्रमाणात होत असल्याने त्याचा पुरवठाही चांगला आहे, असे त्या पत्रात म्हटले आहे. कोरोना साथीच्या सुरुवातीला जगभरात कोविड 19 टेस्टिंग कीटचा तुटवडा होता. मात्र आता हे कीट्स स्थानिक बाजारातही उपलब्ध आहेत. मात्र यापूर्वी आयात कराव्या लागणारे कीट्स आणि टेस्ट करण्यासाठी लागणारे कष्ट यामुळे ICMR ने यापूर्वी कमाल 4500 रुपये टेस्टसाठी निश्चित केले होते. परंतु, आता टेस्टिंग कीटचा आवश्यक पुरवठा होत असल्याने चाचणीसाठी लागणारे शुल्क राज्य आणि केंद्र शासित प्रदेश सरकारने लॅबशी चर्चा करुन ठरवावेत, असे ICMR कडून सांगण्यात आले आहे. दरम्यान ICMR कडून आतापर्यंत तब्बल 32,42,160 सॅपल्स टेस्ट करण्यात आल्या आहेत.

ANI Tweet:

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात गेल्या 24 तासांत 6387 कोरोना बाधित नव्या रुग्णांची भर पडली असून 170 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,51,767 वर पोहचला असून त्यापैकी 64425 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 83004 रुग्णांवर अद्याप उपचार सुरु आहेत. दरम्यान देशात कोरोना व्हायरसने 4337 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.