IAF Wing Commander Abhinandan Varthaman (Photo Credits: IANS)

पाकिस्तानी सेनेच्या (Pakistan Army) ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Abhinandan Varthaman) यांच्या सुखरुप सुटकेनंतर त्यांना चार आठवड्यांची वैद्यकीय रजा मिळाली आहे. मात्र रजेसाठी चेन्नईतील आपल्या घरी न जाता त्यांनी श्रीनगर येथील स्क्वाड्रन येथे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ते श्रीनगरला रवाना झाले.

पुलवामा हल्ल्यानंतर 26 फेब्रुवारीला भारतीय वायुसेनेने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत दहशतवादी स्थळं उद्धवस्त केली. त्यानंतर 27 फेब्रुवारीला पाकिस्तानी वायुसेनेच्या 3 विमानांनी भारताच्या हद्दीत प्रवेश केला. याला उत्तर देताना पाकिस्तानचे एफ-16 हे विमान पाडण्यात भारतीय सेनेला यश आले. मात्र भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानी सेनेच्या ताब्यात सापडले. त्यानंतर पाकिस्तानातून तब्बल 55 तासांनी त्यांची सुखरुप सुटका करण्यात आली.

अभिनंदन यांच्या सुटकेनंतर संपूर्ण भारतवासीयांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. आता डॉक्टरांनी त्यांना चार आठवड्यांची वैद्यकीय रजा घेण्यास सांगितले आहे. मात्र रजेसाठी देखील त्यांनी आपल्या घराची निवड न करता श्रीनगर येथील हवाई तळाजवळ राहण्यास प्राधान्य दिले.