Housing Sales in India: आर्थिक वर्षे 2023 मध्ये देशात तब्बल 3.47 ट्रिलियन रुपयांच्या घरांची विक्री; मुंबई आणि पुणे आघाडीवर- Anarock
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

मालमत्ता सल्लागार अॅनारॉक ग्रुपने (Anarock Group) सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2022-23 (FY23) मध्ये भारतातील मोठ्या सात शहरांमधील एकूण निवासी रिअल इस्टेट विक्री (Housing Sales) 48 टक्क्यांनी वाढून तब्बल 3.47 ट्रिलियन रुपये झाली आहे. वर्षभरात विक्री झालेल्या घरांची एकूण संख्या 36 टक्क्यांनी वाढून 379,000 युनिट्सवर गेली आहे. घरांच्या विक्रीबाबत आर्थिक वर्षे 2023 मध्ये मुंबई मेट्रोपॉलिटन रीजनचा (MMR) मूल्य आणि व्हॉल्यूमच्या दृष्टीने सर्वाधिक आहे. आकडेवारीनुसार, विकल्या गेलेल्या एकूण घरांपैकी 30 टक्के घरे एकट्या याच प्रदेशात होती. ही घरे एकूण 1.67 ट्रिलियन रुपयांना विकली गेली. मूल्याच्या दृष्टीने याचा एकूण बाजारातील वाटा 48 टक्के होता.

विकल्या गेलेल्या घरांच्या संख्येनुसार, एमएमआर नंतर पुणे आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) यांचा नंबर लागतो. त्यांचा वाटा अनुक्रमे 17 आणि 16 टक्के होते. विशेष म्हणजे, देशातील प्रमुख शहरांमधील विक्री मूल्य तसेच व्हॉल्यूमच्या बाबतीत पुण्यात अगदी कमी वेळात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या तुलनेत, पुण्यात विक्री झालेल्या एकूण घरांच्या किमतीत 77 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

महत्वाचे म्हणजे 1.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या लक्झरी हाऊसिंग सेगमेंटमध्ये विक्री झालेल्या एकूण युनिट्समध्ये सलग दुसऱ्या वर्षी वाढ दिसून आली. व्हॉल्यूमच्या बाबतीत, या घरांचा एकूण बाजारहिस्सा आर्थिक वर्षे 2022 मध्ये 10 टक्क्यांवरून आर्थिक वर्षे 2023 मध्ये 20 टक्क्यांवर पोहोचला. आर्थिक वर्ष 2021 मध्ये तो 5 टक्के होता. (हेही वाचा: Bhagalpur Under Construction Bridge Collapse: भागलपूरमधील अगुवानी-सुलतानगंज निर्माणाधीन पूल कोसळला)

अॅनारॉकचे अध्यक्ष अनुज पुरी म्हणाले, ‘उत्तम घर असण्याची भावना, वाढलेली कमाई, मोठ्या जागेत राहण्याची इच्छा तसेच पुनर्विक्री मूल्य वाढीच्या दृष्टीने भविष्यात फायदा होणे यामुळे लक्झरी हाऊसिंगमध्ये वाढ झाली आहे. कन्सल्टन्सीच्या मते, लक्झरी रिअल इस्टेटमध्ये विशेषतः कोविड-19 महामारीनंतर वाढ झाली आहे. मोठ्या जागेव्यतिरिक्त, आता तंत्रज्ञानाने सुसज्ज घरांची मागणी वाढली आहे. आर्थिक वर्षे 2023 मध्ये मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन, एनसीआर आणि बेंगळुरूमध्ये लक्झरी घरांची सर्वाधिक विक्री झाली.