Himachal Pradesh: धक्कादायक! डोंगरावरून अचानक होऊ लागला दगडांचा वर्षाव, 9 पर्यटकांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी, पहा अंगावर काटा आणणारा Video
हिमाचल प्रदेश अपघात (संग्रहित संपादित प्रतिमा)

हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh) किन्नौर (Kinnaur) जिल्ह्यात भूस्खलनात नऊ जणांचा मृत्यू झाला असून तीन गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. किन्नौर जिल्ह्यातील बटसेरीजवळ (Batseri) डोंगरावरून दगडांचा वर्षाव होऊ लागल्याने छितकुलवरून सांगलाला जाणारी पर्यटकांची गाडी मध्येच अडकली. या वाहनावर दरड कोसळली. वाहनावर मोठ्या प्रमाणावर दगड पडल्याने नऊ जण ठार झाले तर, तीन जखमी झाले. असे सांगितले जात आहे की कारमधील पर्यटक दिल्ली आणि चंदीगड येथून हिमाचल येथे पर्यटनासाठी आले होते.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. कॉंग्रेसचे आमदार जगतसिंग नेगी म्हणाले की, टेकडीवरून सतत दगड कोसळत असल्याने बचाव कार्यात अडथळा येत आहे. जखमींना इस्पितळात हलविण्यासाठी सरकारकडून हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आली असून, लवकरच ते पोहोचण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. किन्नौरचे डीसी आबिद हुसेन सादिक, एसपी एसआर राणा हेही घटनास्थळी उपस्थित आहेत.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अचानक मोठ मोठाले दगड डोंगरावरून कोसळत आहेत यामुळे पायथ्याशी हल्लकल्लोळ माजला आहे. बटसेरीचे लोकही पोलिसांसह बचावात गुंतले आहेत. दरड कोसळल्यामुळे गावासाठी बासपा नदीवर बांधलेला पूल तुटला आहे, ज्यामुळे या गावाचा संपर्क तुटला आहे. प्राप्त माहितीनुसार, डोंगरावरुन पडलेल्या दगडांच्यासोबत झालेल्या भूस्खलनांमुळे इतर अनेक वाहनांचेही नुकसान झाले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे एसडीओ सांगला राकेश नेगी म्हणाले की, हा रस्ता लवकरच सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. डोंगरावरुन सतत दगड कोसळत असल्याने रस्ता पुनर्संचयित करण्यास वेळ लागत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने सांगला ते छितकुलकडे हा मार्ग बंद केला आहे. (हेही वाचा: Delhi Unlock: दिल्लीकरांसाठी खुशखबर! सोमवारपासून मेट्रो आणि बसेस 100 टक्के क्षमतेने सुरु; सिनेमा हॉल्स, थिएटर 50 टक्के क्षमतेसह उघडतील)

दुसरीकडे शनिवारी मध्यरात्री नॅशनल हायवे 505 काझा-समदो अंतर्गत येणाऱ्या काझाच्या लारा नाला परिसरात मुसळधार पाऊस झाला. जोरदार पाऊस व ढगफुटीमुळे नाल्याला पूर आला, मात्र जीवितहानी झाली नाही. पण रस्ता खराब झाला आहे. यामुळे येथील रस्त्याच्या दुतर्फा 50 हून अधिक वाहने अडकली आहेत.