
आज (ऑक्टोबर 21) विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील 288 मतदारसंघासाठी मतदान पार पडत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सामान्य नागरिक तर मतदान केंद्रावर हजेरी लावतच आहेत पण त्यासोबतच अनेक बॉलीवूडमधील सिनेकलाकारांनी सकाळीच जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. आमिर खान हे त्यांच्या पत्नी किरण राव यांच्यासोबत मतदार केंद्रावर पोहोचले होते.
मतदान करून आल्यावर त्यांनी मीडियाशी बोलताना का मतदान केले याबद्दल थोडक्यात सांगितले. आमिर म्हणाले की, 'ही राज्यातील निवडणूक आहे आणि तितकीच महत्त्वाची देखील आहे. त्यामुळे मी मत देताना सगळ्याच गोष्टींचा आणि मुद्द्यांचा सारासार विचार करूनच मत दिले आहे. तसेच मी सर्व मतदारांना मतदान करण्याची विनंती करतो."
आमिर यांच्या पत्नी किरण राव म्हणाल्या, "मी मत देताना शेती, रोजगार व पायाभूत सुविधा हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन मतदान केले आहे. त्यामुळे प्रत्येकानेच या मुद्द्यांचा विचार करून मतदान करावे."
आमिर आणि किरण यांनी मुंबईतील वांद्रा पश्चिम येथे मतदान केले. तसेच लारा दत्ता, रवी किशन, रेणुका शहाणे, पद्मिनी कोल्हापुरे या कलाकारांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.