कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट आता भारतात सुद्धा येऊन धडकले आहे, साहजिकच जगभरात या व्हायरस मुळे झालेले मृत्यू पाहता सर्वत्र दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे, काही देशातून भारतात येणाऱ्या नागरिकांवर काही दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे तर अन्य भागातून येणाऱ्या नागरिकांची विमानतळावर कसून तपासणी केली जात आहे, अशातच मागील सहा दिवसांपूर्वी राहुल गांधी (Rahul Gandhi) हे सुद्धा इटलीला जाऊन आले आहेत, त्यावेळी राहुल गांधी यांनी कोरोनाची चाचणी केली होती का असा एक खोचक सवाल भाजप खासदार, रमेश बिधुरी (Ramesh Bidhuri) यांनी केला आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या माता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) हे अगोदरच देशात दिल्ली हिंसाचाराच्या मुद्द्यावरून भडकाऊ विचारांचे संक्रमण करत आहेत अशातच आता कोरोना सुद्धा पसरवण्याच्या राहुल यांचा मानस आहे का असेही बिधुरी यांनी म्हंटले आहे.
प्राप्त माहितीनुसार, राहुल गांधी यांनी बुधवारी दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा केला. तत्पूर्वी रमेश बिधुरी यांनी माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी आणि सोनियाजी हे दिल्लीतील हिंसाचाराला आणखीनच तीव्र स्वरूप देऊन लोकांना भडकावणारी विधाने करत आहेत असा आरोप लगावला. तसेच, राहुल गांधी हे दिल्लीतील नागरिकांनी भेटण्यासाठी जाणार आहेत मात्र इतक्या लोकांमध्ये जाण्याआधी त्यांनी स्वतःची चाचणी करून घेतलीय का, ते नुकतेच इटली हुन परतले आहेत, असेही बिधुरी यांनी विचारले आहे.कोरोना व्हायरस पासून बचावासाठी काय तयारी करावी सांगणारा सिंगापूरच्या पंतप्रधानांचा व्हिडीओ शेअर करत राहुल गांधी यांचा नरेंद्र मोदी यांना सल्ला
ANI ट्विट
#WATCH BJP MP Ramesh Bidhuri on Rahul Gandhi's visit to Northeast Delhi: Before going there, I want to ask, you have come from Italy just six days back, have you taken screening test at the airport? Did you take precautions or you want to spread it (Coronavirus)? pic.twitter.com/fasiOkvFJH
— ANI (@ANI) March 4, 2020
दुसरीकडे, राहुल यांनी कालच्या दौऱ्यात ईशान्य दिल्लीतील ब्रजपुरी येथे आंदोलकांनी जाळलेल्या शाळेबाहेर माध्यमांशी संवाद साधला ज्यात त्यांनी या हिंसाचाराची निंदा करत ही शाळा भारताचं भविष्य आहे, द्वेष आणि हिंसेने तिला संपवलं जात आहे. हिंसा आणि द्वेष विकासाचे शत्रु आहेत. भारताची विभागणी केली जात आहे. भारताला जाळलं जात आहे. यामुळे भारतमातेला काहीही फायदा होणार नाही असे म्हंटले आहे.
दरम्यान, चीन पाठोपाठ इटली मध्येही कोरोनचा हाहाकार मागील काही दिवसात पाहायला मिळाला होता, जगभरात आतापर्यंत 3100 च्या वर कोरोनाचे बळी गेले आहेत, केवळ चीन मध्येच याची 3012 उदाहरणे आहेत, अशात खबरदारी बाळगणे अत्यंत महत्वाचे असल्याचे वारंवार सरकारकडून सांगण्यात येतेय.