Assembly Election 2024: लोकसभा निवडणुकीनंतर येत्या काही महिन्यात देशातील 4 महत्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका( Assembly Elections 2024) येऊन ठेपल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या राज्यांचा समावेश आहे. या चारही राज्यातील निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून घोषणांचा पाऊस सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू. या योजनेची सध्या संपूर्ण देशभरात चर्चा आहे. अशातच हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी सोमवारी 'हर घर हर गृहिणी योजना' पोर्टल लाँच केले आहे. याअंतर्गत राज्यातील अंत्योदय कुटुंबांना फक्त 500 रुपयांना गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे. या योजनेसाठी हरियाणा सरकार गृहिणींना लाभ देण्यासाठी 1500 कोटी रुपये खर्च करणार आहे. अहवालानुसार, या योजनेंतर्गत हरियाणातील सुमारे 50 लाख बीपीएल कुटुंबांना 500 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत.
सध्या हरियाणात घरगुती गॅस सिलिंडरची किंमत जवळपास 950 रुपये इतकी आहे. यातील काही रक्कम सबसिडी म्हणून प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांच्या खात्यात DBT द्वारे जमा केली जाणार आहे. या योजनेसाठी हरियाणा सरकार गृहिणींना लाभ देण्यासाठी 1500 कोटी रुपये खर्च करणार आहे. हरियाणामध्ये भाजप सत्तेत आहे. सत्तेत राहण्यासाठी सरकार सर्वोतरी प्रयत्न करणार आहे. एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधताना नायब सिंग यांनी या योजनेची माहिती दिली. हरियाणा विधानसभेत सध्या भाजपचे नायब सिंग हे मुख्यमंत्री आहेत. रविवारी त्यांनी मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत नोंदणीकृत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला.
'हर घर हर गृहिणी योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना फक्त 500 रुपये प्रति सिलिंडर उपलब्ध करून देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. जे कुटुंब या योजनेस पात्र असतील त्यांना वर्षाला 12 सिलिंडर दिले जातील,' अशी घोषणा नायब सिंग यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. यामुळे महागाईच्या दिवसात निवडणूकांनिमित्त सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.