Haryana Car Accident: हरियाणातील भीषण अपघातात 5 जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू
Accident (PC - File Photo)

हरयाणातील भिवानी जिल्ह्यात एका भिषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने बलेनो कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये 5 जिवलग मित्रांसह ट्रकमधील क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना हरियाणातील भिवानी जिल्ह्यात मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या घटनेनं मोठी हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिकांकडून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाचही मित्रांचे मृतदेह भिवानी येथील चौधरी बन्सीलाल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. (हेही वाचा - Chandigarh Clash Video: चंदीगडमध्ये केमिस्ट शॉपच्या कर्मचाऱ्यांमध्ये हिंसक संघर्ष, पाहा व्हिडिओ)

अपघाताची माहिती मिळताच तरुणांच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी घटनास्थळी दाखल होत आक्रोश केला. प्रदीप (वय 30, रा. लडियानली), रवी (वय 22, रा. इंदिवली गाव), जितेंद्र (वय 30, रा. नारनौंड), विकास (वय 28) आणि नसीब (वय 27, रा. बुडेडा गाव) अशी मृत्युमुखी पडलेल्या मित्रांची नावे आहेत. तर ट्रकमधील क्लिनरची ओळख अद्याप पटलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, भिवानी जिल्ह्यातील 5 जिवलग मित्र मंगळवारी पार्टी करण्यासाठी बाहेर गेले होते. रात्री उशीरा ते कारने आपल्या मित्राला घरी सोडण्यासाठी जात होते. यादरम्यान, भिवानी जिल्ह्यातील बहल भागातील सेर्ला गावाजवळ समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.

अपघातासंदर्भात बहल पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र सिंह यांनी सांगितले की, मृतांची ओळख पटली असून त्यांच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आले आहे. ट्रक क्लीनरची ओळख पटलेली नाही.