पाटीदार नेते हार्दिक पटेलांनी उपोषण सोडले !
हार्दिक पटेल (Photo Credit: PTI)

पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी आपले उपोषण आज दुपारी ३ वाजता सोडले. उपोषणाचा आजचा १९ वा दिवस होता. हार्दिक पटेल यांनी उपोषण मागे घेतले तेव्हा, पाटीदार नेते नरेश पटेल उपस्थित होते. उपोषणादरम्यान, हार्दिक पटेल यांना पाटीदार समाजाचे मोठे समर्थन मिळाले. हार्दिक पटेल उपोषण करत असलेल्या तिन्हीही मागण्या गुजरात सरकारने मान्य केल्यामुळे हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.

दरम्यान, भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी हार्दिक यांच्या उपोषणाला पाठींबा दर्शवला होता. तर उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनीही उपोषणादरम्यान हार्दिक पटेल यांची भेट घेऊन उपोषण सोडण्याचा आग्रह केला होता. रावत यांनी हार्दिक पटेलच्या निवासस्थानी त्याची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शवला होता.

दरम्यान, पाटीदार आरक्षणची मागणी करणाऱ्या हार्दिक पटेलांबद्दल बोलताना रावत यांनी सांगितले की, "पटेल यांनी उपोषण सोडून विरोधाचा नवा मार्ग स्वीकारावा. मी पटेल यांना सांगितले की, त्यांचे जीवन देशातील शेतकऱ्यांसाठी, पाटीदार आणि तरुणांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे मी त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन करतो. उपोषणऐवजी त्यांनी मोर्चा किंवा अन्य प्रकारे आपला विरोध दर्शवावा."

हार्दिक पटेलनी ओबीसी कोटा अंतर्गत पाटीदार आरक्षण आणि गुजरातच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अनिश्चित कालावधीसाठी २५ ऑगस्टपासून उपोषण सुरु केले होते. दलित नेते प्रकाश आंबेडकर यांनी हार्दिक पटेलच्या भेटीनंतर सांगितले की, "संसदेतील आरक्षणाची सीमा ५०% हून अधिक वाढवण्यावर चर्चा व्हायला हवी."