
Indian : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी औषधांच्या किमती कमी करण्यासाठी प्रस्तावित कार्यकारी आदेशावर (US Drug Price Order) स्वाक्षरी करण्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय फार्मा (Pharma Sector Stocks Performance) क्षेत्रातील समभागांनी सोमवारी सुरुवातीला घसरण अनुभवली. मात्र, नंतर बाजारातील भावना सुधारल्यामुळे निफ्टी फार्मा निर्देशांकात जोरदार सावर झाला. निफ्टी फार्मा निर्देशांकाने दिवसाची सुरुवात 20,949.70 वर केली होती, मात्र काही वेळातच तो 1,300 पेक्षा अधिक अंकांनी घसरून 20,600 च्या नीचांकी पातळीवर पोहोचला. ही घसरण अमेरिकी धोरणामुळे भारतीय औषध कंपन्यांवर दबाव येण्याची शक्यता लक्षात घेता अपेक्षित होती. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावावर परस्पर सहमतीचे संकेत मिळाल्यानंतर गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा वाढला. परिणामी निफ्टी फार्मा निर्देशांकाने 2.5% म्हणजेच 1,300 अंकांनी झपाट्याने पुनरागमन केले आणि नंतर 21,047 च्या पातळीवर स्थिर झाला.
फार्मा समभागांवर दबाव?
शेबर बाजारातील तज्ज्ञांनी यापूर्वीच इशारा दिला होता की, ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशामुळे फार्मा समभागांवर दबाव येऊ शकतो. सोमवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 वाजता (9:00 AM ET) ट्रम्प यांनी हा आदेश स्वाक्षरीसाठी निश्चित केला होता. या आदेशामुळे अमेरिकी औषधांची किंमत 30% ते 80% पर्यंत कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अभ्यासक काय सांगतात?
बँकिंग आणि बाजार विश्लेषक अजय बग्गा यांनी ANI शी बोलताना सांगितले, अमेरिकेतील औषध धोरणावर सोमवारी सकाळी अधिकृत घोषणा होणार आहे. फार्मा समभागांवर दबाव येणार आहे कारण ट्रम्प 30% ते 80% दरम्यान औषधांच्या किमती कमी करणारा आदेश स्वाक्षरी करणार आहेत. या नव्या धोरणात "Most Favored Nation" (MFN) प्रायसिंग रूल लागू केला जाणार आहे. यामुळे अमेरिका इतर देशांतील सर्वात कमी दराशी आपली औषध किंमत जुळवून घेईल. त्यामुळे अमेरिकी रुग्णांना तात्काळ दिलासा मिळेल, मात्र जागतिक औषध क्षेत्रावर याचे मोठे परिणाम होण्याची शक्यता आहे.
ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) यांसारख्या विश्लेषकांचा अंदाज आहे की, MFN प्रायसिंगमुळे जागतिक स्तरावर औषधांच्या किमतींची पुन्हा घसरण होऊ शकते. त्यामुळे औषध कंपन्या भारतासारख्या कमी किमतीच्या बाजारात किंमती वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकतात. या प्रयत्नांत आंतरराष्ट्रीय व्यापार चर्चेद्वारे भारताच्या पेटंट कायद्यात बदल करण्यासाठी दबाव टाकला जाऊ शकतो, ज्यामुळे भविष्यात भारतीय बाजारात औषधांच्या किमती वाढू शकतात.
दरम्यान, या सर्व चिंता असूनही, निफ्टी फार्मा निर्देशांकातील जोरदार पुनरागमन हे भारतीय औषध उद्योगातील सक्षमता आणि जागतिक नियमांमध्ये बदलांचा सामना करण्याची क्षमता दर्शवते.