Gujarat Shocker: 35 वर्षीय व्यक्तीचा अल्पवयीन मुलीवर चालत्या बसमध्ये बलात्कार; पैशांचे आमिष दाखवून केले अत्याचार 
Representational Image (Photo Credits: Pixabay)

गुजरातच्या (Gujarat) राजकोटमध्ये (Rajkot) चालत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) झाल्याची घटना घडली आहे. एका गरीब कुटुंबातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 35 वर्षीय व्यक्तीने खासगी बसमध्ये बलात्कार केला आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीला पैशाचे आमिष दाखवून हे कृत्य केले. भावाची प्रकृती खालावल्याने अल्पवयीन मुलगी तिच्या आईसह शासकीय केटी बाल रुग्णालयात आली होती. थोड्या वेळाने आई आपल्या मुलाजवळ थांबली, तर ही मुलगी तिच्या दोन भावंडांसह काहीतरी खायला आणायला बाहेर पडली.

त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीची नजर या मुलीवर पडली. तो तिच्या जवळ गेला व तिच्याशी बोलू लागला. त्याने मुलीला नाश्ता आणि पैसे देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तो मुलगी व तिच्या भावंडांना घेऊन रेसकोर्स रिंगरोडला गेला. त्याने त्यांना आईस्क्रीम आणि स्नॅक्स घेऊन दिले. त्यानंतर त्याने मुलीला आपल्यासोबत चोटीला येथे चलण्यास सांगितले. या बदल्यात पैसे देण्याची ऑफर दिली.

मुलगी तयार झाल्यावर, या व्यक्तीने तिच्या दोन भावांना हॉस्पिटलमध्ये सोडले आणि मुलीला ग्रीनलँड चौकडी येथे नेले, तेथून ते स्लीपर कोच बसमध्ये चढले. यावेळी चालत्या बसमध्ये त्याने तिच्यावर बलात्कार केला. घडल्या घटनेमुळे मुलगी खूपच घाबरली होती. इकडे हॉस्पिटलमध्ये तिच्या भावंडांनी आपली बहिण एका अज्ञात व्यक्तीसोबत गेल्याचे आईला सांगितले. त्यानंतर आईने तात्काळ प्रद्युम्ननगर पोलिसांशी संपर्क साधला. (हेही वाचा: विवाहित महिलांप्रमाणेच अविवाहित मुलींनाही गर्भपाताचा अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय)

त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. त्यांनी अनेक सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले. जेव्हा रात्री 2.30 च्या सुमारास आरोपी आणि मुलगी राजकोटला परतले आणि तो तिला दुचाकीवरून हॉस्पिटलमध्ये सोडण्यासाठी गेला, तेव्हा घटनास्थळी थांबलेल्या पोलीस पथकाने तात्काळ पकडले. हनिफ अरब असे आरोपीचे नाव असून तो भगवतीपारा येथे राहणारा रिक्षाचालक आहे. त्याच्याविरुद्ध आयपीसी आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.