गुजरातमध्ये (Gujarat) परीक्षेमधील फसवणुकीबाबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एक 24 वर्षीय महिला तिच्या प्रियकराच्या बदल्यात त्याची बीकॉम तृतीय वर्षाची परीक्षा देण्यासाठी केंद्रावर पोहोचली. परीक्षेच्या काळात तिचा प्रियकर उत्तराखंडला फिरायला गेल्याने महिलेने हे कृत्य केले. हे प्रकरण गुजरातमधील सुरत येथे असलेल्या वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठाशी (VNSGU) संबंधित आहे. या मुलीला परीक्षा हॉलमधून पकडण्यात आले आहे. तिच्या बॉयफ्रेंडऐवजी ती परीक्षेला बसल्याचा आरोप तिच्यावर आहे.
या घटनेमुळे आता केवळ प्रियकराची बी.कॉम.ची पदवीच रद्द होणार नाही तर प्रेयसीला तिची सरकारी नोकरीही गमवावी लागणार आहे. प्रशासन मुलीविरुद्ध कठोर निर्णय घेऊ शकते. महिला तिच्या प्रियकराच्या बीकॉमच्या तृतीय वर्षाच्या परीक्षेसाठी डमी उमेदवार म्हणून हजर झाली होती. चौकशीदरम्यान तिने समितीला सांगितले की, परीक्षेच्या दिवशी तिचा प्रियकर उत्तराखंडमध्ये होता. त्याच्या सांगण्यावरून ती परीक्षा द्यायला तयार झाली. (हेही वाचा: आता ७वी पास विद्यार्थ्यांना मिळणार सरकारी नोकरी, विविध पदांसाठी होणार पदभरती)
FACT समितीच्या संयोजक स्नेहल जोशी म्हणाल्या, ‘डमी उमेदवाराला सर्वात कठोर शिक्षा म्हणजे त्याची स्वतःची पदवी रद्द करणे. या प्रकरणात जास्तीत जास्त शिक्षेबाबत बोलायचे झाल्यास, मूळ विद्यार्थ्याचे मागील सर्व परीक्षेचे निकाल अवैध ठरवून पुढील तीन वर्षांसाठी त्याला परीक्षेला बसण्यापासून वंचित केले जाऊ शकते.’ सहसा, पूर्वी चांगल्या गुणांसह परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी डमी म्हणून बसतात. आता या महिलेने परीक्षा हॉलच्या प्रवेशपत्रात बदल करून त्या जागी प्रियकराऐवजी स्वतःचा फोटो लावला होता आणि पकडले जाऊ नये म्हणून नावातही किरकोळ बदल केले होते. तिने संगणकाचा वापर करून प्रवेशपत्रात बदल केले आणि त्याची प्रिंटआउट घेतली होती.
महाविद्यालयाच्या एका प्राध्यापकाने सांगितले की, साधारणपणे परीक्षा निरिक्षक दररोज बदलतात आणि ते सर्व विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या ओळखत नाहीत, परंतु ते हॉल तिकीट तपासतात. या प्रकरणात, त्याच हॉलमधील आणखी एका विद्यार्थ्याने पर्यवेक्षकांकडे मुलीबाबत तक्रार करून तिची चौकशी करण्यास सांगितले होते. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.