Goa Election Results: गोव्यात काँग्रेस पंजाचे गुडघ्याला बाशींग; निकालापूर्वीच उमेदवार पोहोचले हॉटेलवर, राज्यपालांच्या भेटीची वेळही मागितली
Congress | (Photo Credits: Facebook)

गोवा विधानसभा निवडणूक 2022 (Goa Assembly Elections 2022) मध्ये भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) पक्षात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते आहे. सत्ताधारी भाजप काहीशी पिछाडीवर तर काँग्रेस आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे स्वत: साखळी मतदारसंघातून पिछाडीवर असल्याचे वृत्त आहे. अशात काँग्रेसचा विजयाबाबतचा आत्मविश्वास दुणावला असून जुन्या चुका टाळण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांना हॉटेलवर बोलावले असून, राज्यपालांची भेटीसाठी वेळही मागितली आहे. त्यामुळे निकालाआधीच उतावीळ काँग्रेसने सत्तेसाठी गुडघ्याला बाशींग बाधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

काँग्रेसच्या काही नेत्यांनी गोव्याचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांच्या भेटीसाठी वेळही मागितल्याची चर्चा आहे. काँग्रेस नेत्यांची धारणा आहे की, गोव्यात या वेळी काँग्रेसचेच सरकार येणार. एक तर काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल किंवा गोव्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल. तसे घडल्यास काँग्रेस भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी इतर पक्षांची मदत घेईल. दरम्यान, काँग्रेसने मागच्या वेळच्या चुका टाळण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.पाठिमागच्या वेळी गोव्यात काँग्रेस प्रथम क्रमांकाचा पक्ष असूनही सत्तेत येऊ शकला नव्हता. काँग्रेसच्या अनेक आमदारांनी भाजपा प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस गोव्यात सत्तेतून दूरच राहिली. (हेही वाचा, Assembly Election Results 2022: देशातील 5 राज्यांची विधानसभा निवडणूक मतमोजणी 8 वाजता सुरु, See Visuals)

काँग्रेस पक्षासोबत पाठिमागच्या वेळी झालेला धोका विचारात घेता काँग्रेसने आमदार फुटणार नाहीत याची काळजी घेतली आहे. त्यासाठी निकालापुर्वीच काँग्रेसने आपले उमेदवार हॉटेलवर बोलावले आहेत. आता हे काँग्रेस नेते राज्यपालांना भेटणार का, त्यासाठी राज्यपाल त्यांना वेळ देणार का याबाबत उत्सुकता आहे.

अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंडसह पाच राज्यांच्या विधानसभांसाठी झालेल्या निवडणुकांची आज मतमोजणी पार पडत आहे. प्रदीर्घ काळ प्रचार आणि विविध टप्प्यांमध्ये हे मतदान पार पडले. या मतदानाबाबत निर्माण झालेली उत्सुकता आज संपणार आहे. आज सकाळी 8 वाजलेपासून मतमोजणीस सुरुवात झाली. मतमोजणी पोस्टल बॅलेट मतांपासून सुरु झालेल्या मतमोजणीनंतर आता ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरु आहे. उत्तर प्रदेशसाठी 403, पंजाब- 117, उत्तराखंड- 70 आणि गोव्यासाठी 40 जागांसाठी या ठिकाणी मतदान झाले. मतदारांनी उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद केले. आज या उमेदवारांबाबत जनतेच्या मनात काय आहे हे स्पष्ट होणार आहे.