Cattle | Representational Image | (Photo Credits: PTI)

बजरंग दलाचे माजी नेत्याला कर्नाटक पोलिसांकडून (Karnatak Police) अटक करण्यात आली आहे. गुरांची तस्करी आणि बेकायदेशीर विक्रीत सामील असल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अनिल प्रभू (Anil Prabhu)असे यांचे नाव असून ते बजरंग दलाचे कर्कळा येथील माजी जिल्हाध्यक्ष (Karkala District President) होते.

गुरांच्या तस्करीमध्ये सामील असल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी मोहम्मद यासीन नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. त्याच्या चौकशी दरम्यान प्रभू यांचे नाव समोर आले. या प्रकरणात माझ्या सोबत अनिल प्रभू असल्याचे यासीन याने पोलिस चौकशी दरम्यान सांगितले. तसंच गुरांच्या मांसाचे ट्रान्सपोर्ट करताना प्रभू पैसे घेत होते. गुरांचे मांस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना कोणत्याही प्रकारची पोलिसांकडून अडवणूक होऊ नये, ही जबाबदारी प्रभू पाहत होते.

प्रभू आणि यासीन हे गुरांची चोरी करुन कत्तलखान्यांना विकत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यातून त्यांना कत्तलखान्यांकडून पैसे मिळत असे. दरम्यान, प्रभू यांनी खूप पूर्वीच बजरंग दल सोडले असून सध्या त्यांचा संघटनेशी कोणताही संबंध नव्हता, असे स्पष्टीकरण बजरंग दलाकडून देण्यात आले आहे.

विनाहेल्मेट दुचाकीची स्वारी करताना यासिन याला बंगलेगुडे जंक्शनजवळ वाहतूक पोलिसांनी अडवले होते. त्यानंतर आपली गाडी तेथेच टाकून यासिनने तेथून पळ काढला. यासिनच्या गाडीची तपासणी केली असता त्यातून गायीचे डोके आणि मांस एका प्लॉस्टिक बॅगमध्ये सापडले, अशी माहिती Vartha Bharati या ऑनलाईन पोर्टलमध्ये देण्यात आली आहे.