स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतकं गर्विष्ठ सरकार सत्तेत आहे- सोनिया गांधी
Congress President Sonia Gandhi (Photo Credits: ANI)

मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी विरोधी पक्ष सोडत नाही. त्यामुळे काँग्रेससह अन्य पक्ष मोदी सरकारवर टिका करतच आहेत. त्यात आता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) केंद्र सरकारवर (Central Government) निशाणा साधत मोदी सरकारवर (Modi Government) हल्लाबोल केला आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतकं गर्विष्ठ सरकार सत्तेत आहे, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर टिका केली आहे. त्याचबरोबर नवे कृषी कायदे (New Farm Bills) मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

सोनिया गांधी म्हणाल्या, "अजूनही वेळ आहे मोदी सरकारने सत्तेचा अहंकार सोडून तत्काळ विनाअट तिन्ही काळे कायदे मागे घेऊन थंडीत आणि पावसात प्राण सोडणाऱ्या शेतकऱ्यांचं आंदोलन संपवावं. हाच राजधर्म असून दिवंगत शेतकऱ्यांप्रती खरी श्रद्धांजली आहे."हेदेखील वाचा- धक्कादायक! वीज बिल भरू न शकल्याने शेतकऱ्याची आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये लिहिले- 'माझ्या शरीराचे अवयव विकून कर्ज फेडून घ्या'

तसेच "मोदी सरकारनं हे लक्षात ठेवायला हवं की, लोकशाहीचा अर्थ जनता आणि शेतकरी-कामगार यांच्या हिताचं रक्षण करणं आहे. लोकशाहीत जनभावनेची उपेक्षा करणारी सरकारं आणि त्यांचे नेते प्रदीर्घ काळासाठी शासन करु शकत नाहीत" असंही त्या पुढे म्हणाल्या.

त्याचबरोबर "शेतक-यांच्या आंदोलनाबाबत सरकार गंभीर नसल्याने आजवर 50 पेक्षा अधिक शेतक-यांनी आपला जीव गमावला आहे. काही शेतकऱ्यांनी तर सरकारकडून उपेक्षा होत असल्याने आत्महत्येसारखी पावलंही उचलली आहेत. पण असंवेदनशील मोदी सरकारचं हृदय द्रवलं नाही की आजवर पंतप्रधान किंवा त्यांच्या कुठल्याही मंत्र्याच्या तोंडून सांत्वनाचा एक शब्दही निघाला नाही" अशी बोचरी टिकाही सोनिया गांधींनी मोदींवर केली आहे.