COVID Test | PC: Twtter/ANI

जगभरात दहशत पसरवत असलेल्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या कोरोना व्हेरिएंटची आता भारतामध्येही एंट्री झाली आहे. बघता बघता देशातही या व्हेरिएंटचे रूग्ण वाढत आहे. आज दिल्लीमध्ये तांझानिया (Tanzania) मधून आलेला एक व्यक्ती ओमिक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचं समोर आले आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (Delhi Health Minister Satyendar Jain) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीला LNJP Hospital मध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या परदेशातून आलेले आणि कोविड पॉझिटिव्ह असलेले 17 रूग्ण LNJP Hospital मध्ये दाखल करण्यात आले आहेत.

भारतामध्ये सर्वात प्रथम कर्नाटक मध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन पुरूष ओमिक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचं समोर आले. त्यानंतर काल गुजरातच्या जामनगर मध्ये आणि डोबिंवली मधील एक रूग्ण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. सध्या सार्‍यांवर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. भारत सरकारने परदेशातून प्रवास करून येणार्‍यांच्या ट्रेसिंग, ट्रॅकिंग आणि टेस्टिंग वर भर दिला आहे. सार्‍यांची विमानतळावर चाचणी करून मगच त्यांना पुढे पाठवलं जात आहे.

दरम्यान ओमिक्रॉन हा व्हेरिएंट झपाट्याने संसर्ग करू शकतो अशी भीती संशोधकांच्या मनात आहे. त्याच्या स्पाईक प्रोटीन मधील बदलामुळे तो लसींचा प्रभाव कमी करून रोगप्रतिकार शक्तीवर मारा करू शकत असल्याने त्याच्याबद्दल आरोग्य जगतातून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेदेखील त्याच्याबद्दल चिंता व्यक्त केल्याने आता सार्‍या जगातच त्याच्याबद्दल दहशत पसरली आहे. नक्की वाचा:  Omicron FAQs: कोविड विषाणूचा नवा व्हेरिएंट 'ओमायक्रॉन'मुळे वाढल्या चिंता; जाणून घ्या या नव्या प्रकाराबद्दल सर्वकाही .

ओमिक्रॉन हा प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळला असून आता जगात तो वेगाने पोहचला आहे. युके मध्ये 8 दिवसांतच ओमिक्रॉनची लागण झालेल्यांचा आकडा 160 च्या पार गेला आहे. अमेरिका, कॅनडा मध्येही ऑमिक्रॉनचे रूग्ण आढळले आहे त्यामुळे आता सार्‍यांकडूनच खबरदारी बाळगली जात आहे. WHO चे डिरेक्टर जनरल Dr Tedros Adhanom Ghebreyesus यांनी जगात 23 देशांमध्ये ओमिक्रॉन पसरला असल्याचं म्हटलं आहे.