Omicron in Maharashtra: चिंता वाढली! महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव; कल्याण-डोंबिवली येथील व्यक्तीला लागण 
Coronavirus (Photo Credit: IANS)

देशात ओमिक्रॉनचा (Omicron) चौथा रुग्ण आढळून आला आहे. आज दुपारी गुजरातमधील जामनगरमध्ये तिसरा रुग्ण आढळून आलाहोता, आता संध्याकाळी चौथ्या रुग्णाची महाराष्ट्रात (Maharashtra Omicron) पुष्टी झाली आहे. मुंबई परिसरातील कल्याण-डोंबिवली येथील एका 33 वर्षीय पुरुषाची, जो नुकताच दक्षिण आफ्रिकेतून परतला आहे, कोरोना विषाणू चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ओमिक्रॉनचे हे महाराष्ट्रातील पहिले तर देशातील चौथे प्रकरण आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, हा 33 वर्षीय प्रवासी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथून दुबई आणि दिल्लीमार्गे 24 नोव्हेंबर रोजी मुंबईला पोहोचला. त्याने कोणतीही लस घेतलेली नाही. त्याच्या उच्च-जोखीम असलेल्या संपर्कांपैकी 12 आणि त्याच्या कमी-जोखीम असलेल्या संपर्कांपैकी 23 जणांचा शोध घेण्यात आला आहे. या सर्वांची कोरोना चाचणी नकारात्मक आली आहे. याशिवाय दिल्ली-मुंबई फ्लाइटमधील 25 सहप्रवाशांच्या चाचणीचा निकालही निगेटिव्ह आला आहे.

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, 'आम्ही गेल्या चार-पाच दिवसांपासून परदेशातून येणाऱ्या लोकांचे जीनोम सिक्वेन्सिंग करत आहोत. कस्तुरबा गांधी रुग्णालयात त्याची चाचणी सुरू आहे. या चाचण्यांपैकी, Omicron प्रकाराचे हे पहिले प्रकरण आहे.’ याआधी कर्नाटकात ओमिक्रॉनची लग्न झालेले दोन रुग्ण आढळले आहे. यानंतर, शनिवारी गुजरातमधील जामनगरमध्ये एका वृद्ध व्यक्तीला ओमिक्रॉन प्रकाराची लागण झाल्याची पुष्टी झाली.

24 नोव्हेंबर रोजी दुबईहून दिल्लीमार्गे मुंबईत आल्यानंतर ही व्यक्ती कल्याण-डोंबिवली येथील त्याच्या घरी गेला. येथे त्याला ताप जाणवला. यासोबतच अंगदुखीचीही तक्रार होती. अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तीची कोरोना चाचणी झाली. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले. आज जीनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल आला. संबंधित व्यक्तीला Omicron प्रकाराची लागण झाल्याचे आढळून आले. (हेही वाचा: होम क्वारंटीन असणार्‍या 5 वेळा फोन कॉल ते प्रत्यक्ष भेट, अशी असेल बीएमसी ची नियमावली)

महाराष्ट्रात ओमिक्रॉन प्रकाराचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर राज्य सरकार सतर्कतेच्या मार्गावर आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी यासंदर्भात महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत ओमिक्रॉनच्या या नव्या व्हेरिएंटला तोंड देण्यासाठी पुढील रणनीतीवर चर्चा केली जाईल.