दिल्ली येथे अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये भीषण आग, नऊ जणांचा मृत्यू
दिल्ली येथे अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये भीषण आग, नऊ जणांचा मृत्यू (फोटो सौजन्य-ANI)

दिल्ली (Delhi) येथील करोलबागमध्ये अर्पित पॅलेस हॉटेलला (Arpit Palace Hotel) पहाटे 4 वाजताच्या सुमारास मंगळवारी (12फेब्रुवारी) भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. तर हॉटेलला लागलेल्या आगीमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे.

अर्पित हॉटेलमध्ये पहाटेच्या वेळी सर्वजण गाढ झोपेत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. तर तातडीने अग्निशमन दलाच्या 26 गाड्या घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण आता आणण्यात यश आले आहे. तर आगीमध्ये काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच 25 जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहे.

या प्रकरणी अद्याप आग कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नाही. तरी हॉटेलमध्ये शॉर्टसर्किट मुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हॉटेलला आग लागल्याचे पाहून दोन जणांनी हॉटेलच्या रुममधून खाली उड्या मारल्या. तसेच बहुतांश मृत्यू गुदमरुन झाले असल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेत मृत झालेल्यांपैकी पुरुष,महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.