Karpoori Thakur यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर; आज 100 वी जयंती!
Karpoori-Thakur । PC: X

बिहारचे (Bihar) माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर (Karpoori Thakur) यांना भारत सरकार कडून मरणोत्तर भारतरत्न (Bharat Ratna) जाहीर करण्यात आला आहे. आज (24 जानेवारी) कर्पुरी यांची 100 वी जयंती आहे. कर्पूरी ठाकूर यांनी मागासवर्गीयांच्या हिताचे समर्थन करण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं आहे. सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे ते बिहारमधील तिसरे व्यक्ती आहेत. त्यांच्याआधी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांना भारतरत्न देण्यात आला आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांची घोषणा केली जाते. मात्र यंदा कर्पुरी ठाकूर यांच्या 100 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला या मानाच्या पुरस्काराची घोषणा झाली आहे.

कोण होते कर्पुरी ठाकूर

कर्पुरी ठाकूर हे बिहारच्या राजकारणातील एक प्रमुख व्यक्ती होते. 'जननायक' अशी त्यांची ओळख आहे. सामान्य घरात जन्मलेल्या कर्पुरी यांनी आयुष्यभर कॉंग्रेस विरोधी भूमिका घेत बिहारच्या राजकारणामध्ये आपलं स्थान निर्माण केल्याचं सांगितलं जातं. आणिबाणीच्या काळात त्यांना अटक करण्याचेही प्रयत्न झाले पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत. 1942 मध्ये महात्मा गांधींच्या असहकार चळवळीतही ते सहभागी होते.

कर्पूरी ठाकूर हे 1952 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले तर 1970 आणि 1977 मध्ये असे दोनदा बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत. बिहारमध्ये समाजवादाचे राजकारण करणारे लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार हे कर्पूरी ठाकूर यांचे शिष्य आहेत. गुरूचा वारसा लालू प्रसाद यादव आणि नितीशकुमार यांनीही ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर कायम ठेवला.

1988 मध्ये कर्पुरी ठाकूर यांचे निधन झाले. आज त्यांच्या निधनानंतर 36 वर्षांनी त्यांना मरणोत्तर भारतरत्न देत त्यांच्या कार्यला केंद्र सरकार कडून सलाम करण्यात आला आहे.