राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी (Photo Credits: Facebook)

सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचे पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांना समन्स पाठविला आहे. गँगस्टर इक्बाल मिर्चीशी (Iqbal Mirchi) संबंधित प्रकरणात चौकशीसाठी ईडीने कुंद्रा यांना 4 नोव्हेंबर रोजी त्यांच्या कार्यालयात बोलावले आहे. याबात अद्याप राज कुंद्रा यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. काही दिवसांपूर्वी ईडीने रिअल इस्टेट कंपनी आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचा तपशील तपासला होता. यावेळी हॉस्पिटॅलिटी लिमिटेड या कंपनीचे नावही समोर आले होते, ज्याची डायरेक्टर शिल्पा शेट्टी आहे.

ईडीने राज कुंद्रा यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळील इक्बाल मिर्चीच्या मालमत्तेच्या व्यवहारासंदर्भात चौकशीसाठी बोलावले आहे. आरडब्ल्यूडब्ल्यू डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक रणजीत बिंद्रा यांना ईडीने अटक केली आहे. धीरज वाधवान हेदेखील  आरडब्ल्यूडब्ल्यूची संबंधित आहेत आणि सूत्रांच्या माहितीनुसार, ईडी शिल्पा शेट्टीशी निगडीत कंपनीच्या लिंकचीही चौकशी करेल. रणजित बिंद्रा हा इक्बाल मिर्चीच्या सांगण्यावरून वागत होता. तसेच मिर्चीचा सहकारी हूमायुन मर्चंट याच्याशी त्याच्या मालमत्तेच्या करारावर बोलणी करण्यामध्येही वाधवान याचा मोलाचा वाटा होता. (हेही वाचा: महाराष्ट्र राज्य बॅंक घोटाळा प्रकरण: शरद पवार यांना 'ईडी' नोटीस का पाठवली? याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खळबळजनक खुलासा)

बिंद्राच्या कंपनीने शिल्पा शेट्टी यांच्या कंपनीत 44.11 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आणि 31.54 कोटी रुपयांचे व्याजमुक्त कर्ज दिले. शिल्पाच्या कंपनीवर एप्रिल 2017 ते मार्च 2018 दरम्यान 30.45 कोटी रुपये आणि एप्रिल 2016 ते मार्च 2017 दरम्यान 117.17 कोटी रुपयांचे कर्ज आढळले आहे. याच व्यवहारांबाबत चौकशी करण्यासाठी  राज कुंद्रा यांना बोलावण्यात आले आहे.