पात्रता नसताना राज्य सहकारी बँकेने काही लोकांना कर्ज दिले. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निर्देशानुसार, त्यांना कर्ज देण्यात आल्याचा उल्लेख बँकेच्या ठरावात करण्यात आला. काही लोकांना कर्ज देण्यासाठी शरद पवारांनी पत्र दिल्याची नोंद आहे. त्यामुळे अशा पत्राची आणि कर्जाची चौकशी सुरु आहे. याचा तपास सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) सुरु असल्याची खळबळजनक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये दिली आहे. नेमकी काय म्हणालेत फडणवीस 'हे' जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर वृत्त.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ?
“शरद पवार यांनी काही व्यक्तींना कर्ज देण्याची विनंती केल्याची पत्र पाठवली होती. त्याचा आधारदेखील बँकेने घेतला आहे. त्याचा क्रिमिनल अँगल आहे किंवा नाही हे तपासानंतर स्पष्ट होईल. आपल्याकडे एखादी व्यक्ती आली म्हणून मी त्याला पत्र दिलं, असा बचाव पवार करू शकतात. त्यांनी पत्र दिल्यानंतर बँकेने त्या पत्राच्या आधारावर आणि त्यातही शरद पवार यांनी निर्देश दिल्याप्रमाणे आम्ही कर्ज देत आहोत, अशी नोंद करून कर्ज वाटप करण्यात आलं.”
गेल्या महिन्यांत शरद पवार यांचं ‘ईडी’च प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. ईडीने चौकशीसाठी बोलावले नसतानादेखील पवार यांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर पवार यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आपला निर्णय मागे घेतला होता. सध्या पवार यांच्या चौकशीची गरज नसल्याचे ईडीकडून सांगण्यात आलं होत. तसेच ईडीने पवार यांना भविष्यात गरज लागेल तेव्हा आम्ही नोटीस किंवा समन्स पाठवू त्यानंतर तुम्ही येऊ शकता, असं स्पष्ट केलं होतं.