MLA Santosh Bangar Video: एकनाथ शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची प्राचार्याला मारहाण, व्हिडिओ व्हायरल
Santosh Bangar | (Photo Credits: YouTube)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) आणि शिवराळपणा, वाद हे समिकरण नवे नाही. आताही आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar Video) यांचा नवा कारनामा पुढे आला आहे. ज्याचा व्हिडिओ इंटरनेट आणि सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. हिंगोली (Hingoli) येथील कळमनूरीचे आमदार संतोष बांगर यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य (Principal) अशोक उपाध्याय यांना शिवीगाळ आणि मारहाण केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत आमदार संतोष बांगर प्राचार्यांना शिवीगाळ आणि मारहाण करताना आढळून येतात. त्यांचे कार्यकर्तेही त्यांच्या या कृत्यात सहभागी दिसतात. काही कार्यकर्त्यांनी प्राचार्यांचा कानही पकडल्याचे दिसते. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. व्हिडिओ नेमका कधीचा आहे याबाबत स्पष्ट माहिती मिळू शकली नाही.

आमदार संतोष बांगर यांची मारहाण अथवा शिवीगाळ करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही आमदार संतोष बांगर यांनी अनेक शासकीर अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार यांना शिवीगाळ केल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवीगाळ आणि मारहाणीच्या आरोपांवरुन ते नेहमीच चर्चेत असतात. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतून वेगळ्या गटात गेल्यावरही मंत्रालयात त्यांनी केलेले वर्तन प्रसारमाध्यमांतून चर्चेचा विषय ठरले होते. आमदार संतोष बांगर यांची मात्र या कथीत मारहाणीबद्दल कोणतीही प्रतिक्रिया पुढे आली नाही. (हेही वाचा, आमदार Santosh Bangar 'शिवसेना सोडून नका म्हणत ढसाढसा रडले, बहुमत चाचणीवेळी हळूच शिंदे गटात शिरले')

व्हिडिओ

हिंगोली जिल्ह्यातील वारंगा मसाई यात्रेतही संतोष बांगर आणि गावकऱ्यांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला होता. वारंगा मसाई यात्रा 8 जानेवारी रोजी होती. वारंगा मसाई गावकऱ्यांचा रिवाझ आहे की, देवीच्या यात्रेत सर्वांनी भक्त आणि भाविक म्हणून यावे. कोणत्याही राजकीय नेत्याने नेता म्हणून येऊ नये. शिवाय राजकीय पुढाऱ्यांना यात्रेलाही बोलावले जात नाही. असे असूनही आमदार संतोष बांगर यांनी मोठ्या लवाजम्यासह यात्रेत हजेरी लावली होती. या वेळी गावकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला होता.