माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेलांना ईडीची नोटीस, 'मिर्ची' प्रकरण चांगलच झोंबणार
Praful Patel (Photo Credits: Twitter)

देशातील ब-याच दिग्गज नेत्यांना वेगवेगळ्या घोटाळ्यांप्रकरणी ईडीची नोटीस बजावली जात आहे. या यादीत आता माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल (Praful Patel) समावेश झाला आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा सहकारी इक्बाल मिर्ची याच्या पत्नीसोबत करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारप्रकरणी हे समन्स बजावण्यात आलं आहे. लोकसत्ता ने दिलेल्या वृत्तानुसार, ईडीने 18 ऑक्टोबरला प्रफुल्ल पटेल यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. दरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेत आपले इक्बाल मिर्चीसोबत कोणतेही संबंध नसल्याचा दावा केला आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी आपलं कुटुंब तसंच ‘मिर्ची’ नावाने कुख्यात असलेल्या इक्बाल मेमन यांच्यात झालेल्या आर्थिक व्यवहारावर स्पष्टीकरण दिलं आहे. ज्या व्यवहारावरुन आरोप करण्यात येत आहेत, तो व्यवहार पूर्णपणे कायदेशीर होता असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे. जमिनीचा इतिहास सांगताना प्रफुल्ल पटेल यांनी कशाप्रकारे ही वादग्रस्त जमीन 1990 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या देखरेखेखाली एम के मोहम्मद नावाच्या व्यक्तीकडून इक्बाल याला विकण्यात आली असल्याचं सांगितलं.

“2004 रोजी इक्बाल मेमनसोबत जमिनीचा व्यवहार झाला. हा व्यवहार रजिस्ट्रारच्या समोर झाला. सर्व कागदपत्रं जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवण्यात आली होती. जर इक्बाल मेमनवर आरोप होते, तर प्रशासनाने हा व्यवहार तेव्हाच रोखायला हवा होता,” असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे."आपल्यावर होणा-या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी आपल्याला प्रचार सोडून यावं लागलं आहे", असेही ते म्हणाले. Aarey Protest, शरद पवार ईडी चौकशी दिवशी लागू करण्यात आलेला जमावबंदी कायदा कलम 144 नेमका आहे तरी काय; जाणून घ्या सोप्प्या शब्दात

काय आहे प्रकरण ?

प्रफुल्ल पटेल यांच्यावर कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा सहकारी इक्बाल मिर्ची याच्यासोबत आर्थिक आणि जमीन व्यवहार केल्याचा आरोप आहे. पटेल यांच्या कुटुंबाच्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून इक्बाल मेमनसोबत आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचं आरोपात म्हटलं आहे. याचा तपास सध्या ईडीकडून करण्यात येत आहे. पटेल यांच्या कुटुंबाची मालकी असेलल्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून इक्बाल मेमन याला एक प्लॉट देण्यात आला होता. हा प्लॉट वरळीमधील नेहरू तारांगणच्या समोर आहे. याच ठिकाणी मिलेनियम डेव्हलपर्सने १५ मजली इमारत उभी केली आहे. त्याचे नाव सीजे हाऊस असं ठेवण्यात आलं आहे.