IMA Black Day: देशातील डॉक्टर उद्या मेणबत्ती पेटवून व्यक्त करणार निषेध; आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हिंसाचाराविषयी कायदा न केल्यास 23 एप्रिल रोजी ‘काळा दिवस’ पाळण्याचा आयएमएचा इशारा
Coronavirus Outbreak in India (Photo Credits: IANS)

डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरातील डॉक्टर बुधवारी रात्री नऊ वाजता मेणबत्ती लावून आपला निषेध व्यक्त करणार आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध जाहीर केला आहे. आयएमएने नमूद केले आहे की, सरकारने सुरक्षित कामाच्या ठिकाणी आमच्या कायदेशीर गरजा पूर्ण केल्या पाहिजेत व त्यानुसार वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील हिंसाचार त्वरित थांबला पाहिजे. इंडियन मेडिकल असोसिएशननेही देशासाठी व्हाईट अलर्ट (White Alert) जारी केला आहे, तसेच त्यानंतर काळा दिन (Black Day) साजरा करण्याचा इशारा त्यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

व्हाईट अलर्टनंतरही डॉक्टर आणि रुग्णालयांवरील हिंसाचाराबाबत केंद्रीय कायदा लागू करण्यात सरकार अपयशी ठरल्यास, आयएमए 23 एप्रिलला ‘काळा दिवस’ म्हणून घोषित करेल, असे आयएमएने म्हटले आहे. या दिवशी देशातील सर्व डॉक्टर काळा बॅज लावून काम करतील. देशातील सर्व डॉक्टर आणि रुग्णालये 22 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता मेणबत्ती पेटवतील, हा देशासाठी एक 'व्हाईट इशारा' असेल.

आयएमएने एका निवेदनात म्हटले आहे की, 'सुरक्षित कार्यस्थळांच्या ठिकाणी आमच्या कायदेशीर गरजा पूर्ण कराव्यात व शिवीगाळ, हिंसाचार त्वरित थांबवायला हवा.'  याआधी गृहनिर्माण मंत्रालयाने (एमएचए) राज्यांना पाठवलेल्या पत्रात कोरोना व्हायरसच्या लढ्यात मदत करणाऱ्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांबाबत होणारा हिंसाचार थांबला पाहिजे असे सांगितले होते. मात्र त्यानंतरही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. (हेही वाचा: राष्ट्रपती भवनातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संंपर्कात; 125 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचे विलगीकरण)

दरम्यान, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) च्या निवासी डॉक्टर असोसिएशनने (RDA), डॉक्टरांना त्यांच्या घरातून जबरदस्तीने बाहेर काढल्याबद्दल घरमालकांबाबत तक्रारी दाखल केल्या होत्या. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हस्तक्षेप करून, अशा घरमालकांवर कठोर कारवाईची हमी दिली.