Crawford Market (Photo Credits-ANI)

कोविड-19 (Coronavirus) महामारीनंतर, यंदा दिवाळीचा (Diwali 2021) सण सर्वसामान्यांसह देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. मागच्यावर्षी निर्बंधांमुळे हा उत्सव सुना सुना गेला मात्र यंदा लोकांनी मागच्यावर्षीची कसर भरून काढली. लॉकडाऊनमुळे लोकांच्या खिशावर ताण येऊनही यावर्षी दिवाळीला बक्कळ पैसा खर्च केला गेला आहे. गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने म्हटले आहे की दिवाळीच्या उत्सवामध्ये देशभरात सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांचा व्यापार झाला आहे.

महत्वाचे म्हणजे, दिवाळीच्या निमित्ताने गेल्या 10 वर्षांतील हा विक्रमी व्यवसायाचा आकडा आहे. कॅटचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, आमची संशोधन शाखा, कॅट रिसर्च अँड ट्रेड डेव्हलपमेंट सोसायटीच्या सर्वेक्षणात, या वर्षी सणासुदीच्या हंगामात, दिवाळीची विक्री 1.25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. हा अंदाज सर्व राज्यांतील आणि देशभरातील 20 प्रमुख शहरांमधील मोठ्या व्यावसायिकांच्या सर्वेक्षणावर आधारित आहे. परंतु, सरकारच्या फटाके धोरणामुळे फटाके उत्पादक व विक्रेत्यांचा सुमारे 10 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय बुडाला आहे.

खंडेलवाल पुढे म्हणाले की, ‘पॅकेजिंग’ हा एक उदयोन्मुख व्यवसाय म्हणून समोर आला आहे. या व्यवसायामुळे यंदा दिवाळीत सुमारे 15,000 कोटी रुपयांची उलाढाल झाली. दिवाळीतील हा व्यवसाय पाहता, डिसेंबर 2021 अखेर देशभरातील बाजारपेठांमध्ये सुमारे 3 लाख कोटी रुपयांच्या भांडवलाची आवक होईल, अशी आशा व्यक्त केली गेली आहे. (हेही वाचा: Gold Quality and Purity: 22 कॅरेट, 23 आणि 24 Carat सोने म्हणजे काय? तिन्हीमध्ये नेमका फरक काय?)

CAIT सरचिटणीस यांनी निदर्शनास आणून दिले की, यावर्षी दिवाळीमध्ये प्रामुख्याने चिनी वस्तूंवर पूर्ण बहिष्कार व भारतीय वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर वापर हा ट्रेंड दिसून आला. यामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये झालेले बरेच नुकसान भरून काढण्यासाठी व्यापाऱ्यांना मदत झाली. लॉकडाऊनमुळे अभूतपूर्व मंदीतून मोठा दिलासा मिळाल्याने देशभरातील व्यापारी वर्गानेही दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली. यासोबतच त्यांनी ‘चिनी वस्तूंवर बहिष्कार’ टाकल्याने दिवाळीत चीनचा 50 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय बुडाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.