प्रातिनिधिक प्रतिमा (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

छत्तीसगड उच्च न्यायालयाने (Chhattisgarh High Court) एका घटस्फोटाच्या खटल्याच्या (Divorce Case) सुनावणीदरम्यान एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, जर एखादी पत्नी पुरुषांप्रमाणे पान मसाला, गुटखा (Gutkha), नॉनव्हेज खाऊन, दारू पिऊन पतीला त्रास देत असेल, तर ती क्रूरता आहे. न्यायमूर्ती गौतम भादुरी आणि न्यायमूर्ती राधाकिशन अग्रवाल यांच्या दुहेरी खंडपीठाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेश फेटाळून लावत पतीने दाखल केलेली घटस्फोटाची याचिका मान्य केली आहे.

माहितीनुसार, कोरबा जिल्ह्यातील बांकीमोंगरा येथे राहणाऱ्या एका तरुणाचे लग्न कटघोरा येथील तरुणीशी झाले होते. लग्नानंतर 7 दिवसांनी 26 मे 2015 रोजी सकाळी पत्नी बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडली होती. पतीने तिला उपचारासाठी डॉक्टरांकडे नेले असता तिला दारू पिण्यासोबतच मांसाहार आणि गुटख्याचे व्यसन असल्याचे समोर आले. ही बाब महिलेच्या सासरच्या मंडळींना समजल्यावर तिचे हे व्यसन सोडवण्यासाठी त्यांनी तिला वेगवेगळ्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र महिलेने आपले गुटखा व दारूचे व्यसन सोडण्यास नकार दिला. (हेही वाचा: अल्पवयीन मुलीसोबत 2 मुलांची आई फरार; समलैंगिक संबंध असल्याची माहिती, लग्न करण्यासाठी घर सोडल्याचा आरोप)

यानंतर तिने सासरच्या लोकांशी गैरवर्तन सुरु केले. महत्वाचे म्हणजे गुटखा खाल्ल्यानंतर महिला बेडरूममध्ये कुठेही थुंकायची आणि यासाठी तिला अडवल्यावर पतीसोबत भांडण करायची. महिलेच्या अशा वागण्याला कंटाळून पतीने घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. याचिकेत म्हटले आहे की, महिलेने 30 डिसेंबर 2015 रोजी आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. यासाठी तिने दोनदा छतावरून उडी मारली आणि त्यानंतर दोनदा कीटकनाशक प्यायले. मात्र, त्यावेळी ती वाचली.

पत्नीच्या अशा वागण्यामुळे होत असलेला मानसिक त्रासाला कंटाळून पतीने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु कौटुंबिक न्यायालयाने पतीची याचिका फेटाळली होती. या निर्णयाला आव्हान देत पतीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले. आता उच्च न्यायालयाच्या दुहेरी खंडपीठाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेश फेटाळून लावत पतीचे घटस्फोटाचे अपील मान्य केले आहे.