Indian Marriage | Representational Image (Photo Credits: Pixabay)

झारखंडमधील (Jharkhand) कोयलांचलमध्ये लेस्बियन विवाहासंबंधी (Lesbian Wedding) एक प्रकरण समोर आले आहे. ही घटना जिल्ह्यातील भुली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच वस्तीत राहणाऱ्या एक विवाहित महिला आणि एका अल्पवयीन मुलीशी संबंधित आहे. सांगितले जात आहे की, विवाहित महिलेला अल्पवयीन मुलीशी लग्न करायचे होते व त्यासाठी दोघीही 15 डिसेंबरपासून घरातून पळून गेल्या आहेत. महत्वाचे म्हणजे विवाहित महिलेला दोन मुले आहेत.

अल्पवयीन मुलीच्या आईने सोमवारी धनबादच्या ग्रामीण एसपींची भेट घेऊन याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर आता पोलीस या दोन मुलींचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विवाहित महिलेचे परिसरातीलच एका अल्पवयीन मुलीसोबत संबंध होते. घरच्यांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी या नात्याला विरोध केला, मात्र त्यानंतरही दोघी भेटत राहिल्या. दोघींनाही एकमेकींसोबत लग्न करायचे होते व त्यासाठी त्या 15 डिसेंबर रोजी घरातून पळून गेल्या. घरच्यांनी त्यांचा शोध घेतला मात्र त्या सापडल्या नाहीत.

जेव्हा दोघींच्याही मोबाईलवर त्यांचा संपर्क होऊ शकला नाही तेव्हा अल्पवयीन मुलीच्या आईने सोमवारी जिल्ह्याच्या ग्रामीण पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. याआधीही एकदा दोघी घरातून पळून गेल्याचे सांगण्यात आले. आपली मुलगी अल्पवयीन असून तिला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे. धनबादचे डीएसपी अमर कुमार पांडे यांनी सांगितले की, मुलीच्या आईने तक्रार दाखल केली आहे. (हेही वाचा: आईने मोबाईल गेम खेळण्यास केली मनाई; रागाच्या भरात 10 वर्षांच्या मुलाची आत्महत्या)

मुलींचा शोधण्यासाठी पोलीस संभाव्य ठिकाणांवर छापे टाकत आहेत. हे मानवी तस्करी किंवा समलैंगिक संबंधाचे प्रकरण असू शकते, असे पोलिसांनी सांगितले आहे. दोघींचा तपास लागल्यावर त्यांची चौकशी केल्यानंतरच घटनेची माहिती समोर येईल.