Death (Photo Credits-Facebook)

देशात मोबाईलचा (Smart Phone) वापर आणि त्यातही मोबाईल गेम्सच्या (Mobile Game) वाढत्या ट्रेंडमुळे अनेक घातक परिणाम समोर येत आहेत. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये (Lucknow) मोबाईल गेममुळे एका 10 वर्षांच्या मुलाने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाच्या आईने त्याला मोबाईल गेम खेळण्यास मनाई केल्याने त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ही घटना लखनौमधील हुसैनगंज पोलीस ठाण्याच्या चितवापूर भागातील आहे. इथे कोमल नावाची एक महिला तिच्या दोन मुलांसह वडिलांच्या घरी राहते. आरुष (10 वर्षे) आणि विदिशा (12 वर्षे) अशी या दोन मुलांची नावे आहेत. आरुष गेल्या अनेक दिवसांपासून थोडे विचित्र वागत असल्याचे दिसून येत होते. तो शाळेतही जात नव्हता आणि दिवसभर मोबाईलवर गेम खेळायचा. मोबाईल गेममुळे त्याचा अभ्यासही मागे पडला होता.

आरुषच्या अशा वागण्याबाबत कोमल त्याला नेहमी खडसावत होती. एके दिवशी आरुष मोबाईलवर गेम खेळत असताना, कोमलने त्याचा फोन घेतला व त्याला गेम खेळण्यासाठी मनाई केली. आरुषला याचा राग आला व त्याने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले. मुलाचा राग शांत झाल्यावर तो स्वत: दार उघडेल, असे कोमलला वाटले. मात्र, बराच वेळ दार बंद राहिल्याने कोमलला त्याची काळजी वाटू लागली.

अखेर नातेवाईकांनी दरवाजा तोडला असता आरुषने आत्महत्या केल्याचे दिसून आले. नातेवाइकांनी त्याला तत्काळ खाली उतरवले मात्र, त्याचा आधीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी डीसीपी अपर्णा रजत कौशिक यांनी सांगितले की, त्यांना एका मुलाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली होती. मात्र, अद्याप याप्रकरणी मुलाच्या आईकडून कोणतेही निवेदन मिळाले नाही. मुलगा मोबाईलवर खूप गेम खेळत होता, अशी माहिती मिळाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (हेही वाचा: मंदिर, मशिदींवरील स्पीकर लहान मुलांना सकाळी झोपेटून उठविण्यासाठी वापरावेत- हरियाणाचे शिक्षणमंत्री कंवरपाल गुर्जर)

दरम्यान, स्मार्टफोनच्या वाढत्या वापरानंतर गेमिंगचे जग खूप वेगाने बदलले आहे. आता उच्च ग्राफिक्स आणि विविध लेव्हल्सचे लाखो गेम उपलब्ध आहेत. मुले अशा गेम्सच्या इतके आहारी गेले आहेत की, यासाठी ते आपला प्राणही द्यायला तयार आहेत. याआधी पबजी खेळण्यास नकार दिल्याने एका 16 वर्षीय मुलाने लखनऊमध्ये आपल्या आईवर गोळ्या झाडल्या होत्या.