आई-वडिलांवर लोकांसमोर भिक मागण्याची वेळ (Photo Credit : ANI)

बिहारच्या (Bihar) समस्तीपूरमधून (Samastipur) माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मंगळवारी येथील सदर रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मुलाचा मृतदेह देण्यासाठी गरीब पालकांकडे 50 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. पालकांकडे इतके पैसे नव्हते त्यामुळे ते बिचारे आपल्या गावी परत आले. त्यानंतर ते गावात हात पसरून भिक मागताना दिसले. लोकांच्या घरी जाऊन आपली असहायता सांगून ते मदतीचे आवाहन करत होते. यादरम्यान कोणीतरी घटनेचा व्हिडिओ बनवला, जो आता व्हायरल झाला आहे.

50 हजाराची रक्कम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मागितली होती. व्हिडीओ समोर आल्यानंतर हे प्रकरण रुग्णालय व्यवस्थापनापर्यंत पोहोचले व त्यानंतर तातडीने मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. यानंतर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. गावकऱ्यांनी सांगितले की, हे कुटुंब इतके गरीब आहे की ते मुलाचे अंत्यसंस्कार देखील करू शकले नाहीत. गावातील इतर लोकांनी त्यांना मदत केली. आरोग्य मंत्री मंगल पांडे यांनी या प्रकरणी सीएमएचओकडून 24 तासांत संपूर्ण अहवाल मागवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ताजपूर पोलीस ठाण्याच्या आहार गावातील महेश ठाकूर यांचा 25 वर्षीय मुलगा संजीव ठाकूर 25 मेपासून बेपत्ता होता. कुटुंबाने खूप शोध घेतला परंतु तो सापडला नाही. अखेर 7 जून रोजी त्यांना मुसरीघरारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती त्यांना पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर पालकांनी सदर रुग्णालयात धाव घेतली. (हेही वाचा: पोटच्या 15 दिवसांच्या मुलाला विकून आईने विकत घेतले फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशिन; 5 लाखांमध्ये झाला सौदा)

सुरुवातील पोस्टमॉर्टम करणाऱ्या व्यक्तीने मृतदेह दाखवण्यास नकार दिला. नंतर विनवणी केल्यानंतर त्याने मृतदेह दाखवला. तो मृतदेह संजीव ठाकूर याचाच असल्याचे पालकांनी ओळखले. वडिलांनी मृतदेहाची मागणी केली असता कर्मचाऱ्याने 50 हजार रुपये मागितले. पालकांकडे इतके पैसे नव्हते त्यामुळे त्यांना मृतदेह देण्यास नकार दिला. सिव्हिल सर्जन डॉ.एस.के.चौधरी यांनी आपल्याला याबाबत माध्यमांद्वारे माहिती मिळाल्याचे सांगितले. याची चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले.