बाबा गुरमीत राम रहीम (Photo Credits: twitte)

साध्वीचे लैंगिक शोषण केले प्रकरणी दोषी ठरलेल्या बाबा गुरमीत राम रहीमला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने एका प्रकरणात जामीन तर दिला. पण, तरीही त्याची रवानगी तुरुंगातच असणार आहे. सुमारे ४०० साधूंना नपुंसक बनवल्याचा राम रहीमवर आरोप होता. या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने राम रहीमला जामीन दिला. मात्र, साध्वी लैंगिक शोषण प्रकारात दोषी आढळल्याने कारागृहात २० वर्षे कैदेची शिक्षा भोगत असल्याने राम रहीमचा मुक्काम तुरुंगातच असणार आहे.दरम्यान, ऑगस्ट महिन्यात सीबीआय न्यायालयाने राम रहीमची याचिका फेटाळून लावली होती.

सीबीआयचे विशेष न्यायाधीश जगदीप सिंह यांच्या पीठासमोर झालेल्या सुनावनीत राम रहीम याला जामीन देण्यात आला. दरम्यान, साधूंना नपुंसक बनविल्याच्या आरोपाचा राम रहीमवरील खटला न्यायमूर्ती सुनील राठी यांच्या पीठासमोर आहे. मात्र, ही याचिका रद्द झाल्यानंतर राम रहीमने जगदीप सिंह यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता सीबीआयवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात की, या प्रकरणात सीबीआय योग्य तो पुरावा मिळवू शकली नाही. दरम्यान, राम रहीमला जामीन मिळूनही कोणतीही सूट मिळणार नाही. त्याला कारागृहातील शिक्षा पूर्ण करावीच लागेल.

दरम्यान, राम रहीम सध्या रोहतक येथील सुनारीया कारागृहात आहे. विशेष असे की, याचिकाकर्ता हंसराज चौहाण यांच्या याचिकेवर साधूंना नपुंसक बनवले जाण्याच्या प्रकरणात २३ डिसेंबर २०१४ ला सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले होते. याचिकाकर्त्याने दावा केला होता की, डेरा सच्चा सौदामध्ये ईश्वरप्राप्तीच्या नावाखाली सुमारे ४०० साधूंना गुप्तेंद्रिय कापून नपुंसक बनविण्यात आले होते.