Weather Forecast | (Photo Credit- X/ANI)

Weather Update Today: उत्तर भारत आज ( शनिवार, 4 जानेवारी) दाट धुक्यात हरवल्याचे पाहायला मिळाले. अनेक भागांमध्ये धुक्यामुळे (Delhi Fog) दृश्यमानता घटली. परिणामी नागरिकांच्या प्रवास, दळणवळण आणि दैनंदिन कामांवर परिणाम झाला. खास करुन दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ शनिवारी धुक्याचे मोठे शिकार झाले. ज्यामुळे हवाई वाहतुकीवर (Flight Delays) मोठा परिणाम झाला. हवामान अंदाज (Weather Forecast) विचारात घेत इंडिगोने तातडीने एक सल्ला आणि सूचनापत्र जारी करत तत्पुरत्या स्वरुपात विमानांच्या आगमन आणि निगमनास स्थगिती दिल्याचे जाहीर केले. दरम्यान, आदल्याच दिवशी (शुक्रवार, 3 जानेवारी) प्रतिकूल हवामानामुळे नोंदवलेल्या 400 व्यत्ययांमध्ये 50 हून अधिक विमानांच्या उड्डाणांस विलंब झाला.

दाट धुक्यामुळे काय घडले?

श्रीनगर विमानतळावर, शनिवारी सकाळी विमानोड्डाण पूर्णपणे थांबवण्यात आले. हा निर्णय घेण्याच प्राथमिक कारण म्हणजे 'खराब दृश्यमानता' असल्याचे विमानतळ प्राधिकरणाने सांगितले. दृश्यमानता सुधारेपर्यंत एअरलाइन्सने सकाळच्या सर्व फ्लाइटचे वेळापत्रक बदलले आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. (हेही वाचा, Cold Wave Alert: थंडी आणखी वाढणार, पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे पारा घसरणार, हवामान खात्याकडून थंडीच्या लाटेचा इशारा)

विमानसेवा विस्कळीत

जम्मू आणि काश्मीर आणि हिमाचल प्रदेशसाठीहिमवृष्टीचा इशारा

भारतीय हवामान विभाग (IMD) ने शनिवारी जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमध्ये जोरदार बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे आणि रविवारी हिमाचल प्रदेशमध्येही अशीच परिस्थिती अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. जम्मू आणि कश्मीर आणि लडाखच्या अनेक भागांमध्ये तापमान आधीच शून्याखालील नोंदवले गेले आहे. दरम्यान, शुक्रवारी दिल्लीसह वायव्य भारतात किमान तापमान 6°C ते 11°C दरम्यान होते. हवामान अंदाज वर्तवताना उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकात थंडीची लाट कायम राहील, असा अहवालही आयएमडीने दिला आहे.

अफगाणिस्तानातील वादळाचा उत्तर भारतावर परिणाम?

पश्चिम अफगाणिस्तानवर चक्रीवादळ म्हणून कायम असलेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा उत्तर भारतातील हवामानावर परिणाम झाला आहे. कोर वाऱ्यांसह उपोष्णकटिबंधीय पश्चिमेकडील जेट प्रवाह बाधित प्रदेशांमध्ये दाट धुके आणि हिमवृष्टीमध्ये भर घालत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

अनेक ठिकाणी शून्य दृश्यमानता

दिल्लीत दाट धुके आहे. ज्यामुळे पालम आणि सफदरजंग, अमृतसर, आग्रा, चंदीगड आणि ग्वाल्हेरसह अनेक विमानतळांवर शून्य दृश्यमानता नोंदवली गेली. IMD ने नोंदवले की, दिल्लीच्या IGI विमानतळावरील दृश्यमानता शनिवारी पहाटे 0 मीटरपर्यंत घसरली, ज्यामुळे सर्व धावपट्ट्यांना CAT-III नियमांनुसार ऑपरेट करण्यास भाग पाडले गेले, एक नेव्हिगेशन प्रणाली कमी-दृश्यमानतेसाठी डिझाइन केलेली आहे.

दृश्यमानता घटल्याची हवामान विभागाकडून पुष्टी

रेल्वे सेवा विस्कळीत

दाट धुक्यामुळे रेल्वे सेवांमध्येही मोठा विलंब झाला. दिल्लीत येणाऱ्या 50 हून अधिक गाड्या उशिराने धावत होत्या. नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस चार तास उशिराने तर वाराणसी वंदे भारत एक्सप्रेस 14 तास उशीराने धावली. आनंद विहार टर्मिनल सुपरफास्ट एक्स्प्रेससह इतर महत्त्वाच्या गाड्यांना सात तासांपेक्षा जास्त उशीर झाला.

खराब हवेच्या गुणवत्तेमध्ये दिल्लीमध्ये GRAP स्टेज III लादला

सध्या सुरू असलेल्या थंडीच्या लाटेत दिल्लीत हवेची गुणवत्ता खालावत आहे. शहराने 351 चा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) नोंदवला आणि स्वत:ला 'अत्यंत खराब' श्रेणीमध्ये ठेवले. परिणामी अधिकाऱ्यांनी ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन (GRAP) स्टेज III लादला आहे, ज्यामध्ये बांधकाम, जुन्या वाहनांचा वापर आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेसमध्ये शिफ्ट यांचा समावेश आहे.

दरम्यान, IMD ने जम्मू आणि काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. या ठिकामी शून्याखालील तापमान नोंदवले जाऊ लागल्याने थंडीची लाट वाढवणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, राजधानी दिल्ली किंवा उत्तर भारतातून प्रवास करण्यासाठी आगोदर हवामान अंदाज विचारात घ्या, असा सल्ला दिला जात आहे.