दिल्ली (Delhi) मध्ये राहणार्या 28 वर्षीय मुलीला तिच्या मित्राकडूनच छळलं जात असल्याचा एक प्रकार समोर आला आहे. सुमारे आठवडाभराच्या छळवणूकीनंतर तिच्या शरीरावर गंभीर स्वरूपाच्या जखमा दिसून आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या शरीरावर आरोपीकडून गरम डाळ फेकण्याचे देखील प्रकार झाले आहेत. या प्रकरणी आरोपी पारसला अटक झाली आहे. त्याच्यावर बलात्कार, इजा पोहचवण्याचा गंभीर प्रकार, लैंगिक छळवणूकीचे आरोप आहेत.
पीडीत तरूणी पश्चिम बंगाल मधील दार्जिलिंग मधील आहे. दिल्लीत ती आपल्या मित्रासोबत राहत होती. हॉस्पिटल मध्ये दाखल झाली तेव्हा तिच्या शरीरावर सुमारे 20 गंभीर खुणा आढळून आल्या आहेत. तिला हॉस्पिटल मधून आता सुट्टी मिळाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पारस सोबत पीडीत तरूणी सुमारे महिनाभर भाड्याच्या घरात राहत होती. दक्षिण दिल्लीच्या Neb Sarai भागात ती राहत होती. एकत्र राहण्यापूर्वी त्यांची 3-4 महिन्यांची ओळख होती. जानेवारी 30 दिवशी Neb Sarai पोलिस स्टेशन मध्ये एकाने फोन करून तरूणीला तिच्या मित्राकडून त्रास दिला जात असल्याची माहिती देण्यात आली. माहितीच्या आधारे पोलिस घटनास्थळी पोहचले. तरूणीची अवस्था बघून तिला तातडीने एम्स मध्ये दाखल केले. 2 फेब्रुवारीला पारसला अटक झाली.
तरूणीच्या जबाबानुसार, तिला नोकरीसाठी बेंगलूरु ला जायचं होतं. मोलकरीण म्हणून ती तेथे काम करणार होती. मात्र ती दिल्ली मध्ये मित्राला भेटायला थांबली. पारसने तिला दिल्लीतच काम शोधून देण्याचं आमिष दाखवलं होतं. पारस मूळचा उत्तराखंड चा असून तो दिल्लीत एका छोट्या हॉटेल मध्ये कूक म्हणून काम करत होता. याप्रकरणी पीडीतेच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम 323 , 376, 377 चे गुन्हे दाखल केले आहेत.